श्रीरंग विद्यालय, ठाणे येथे आंतरशालेय स्पर्धा संपन्न
ठाणे : संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान ठाणे जिल्हांतर्गत श्रीरंग विद्यालय, ठाणे येथे दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत `नैतिक शिक्षण योजना’ उपक्रमात सहभागी 72 शाळांमधील निवडक 165 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता ४थी/५वी साठी अनुक्रमे रामायण आणि संतकथा या विषयावरील कथाकथन स्पर्धा, इयत्ता ६वी – चित्रकला स्पर्धा व इयत्ता ७वी/८वी साठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सौ. मानसी जोशी ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. चित्रकला शिक्षक किशोर वेदे, सौ. स्वाती माने, ठाणे नवीमुंबई विभाग प्रमुख सौ. शितलताई निकम, नवी मुंबई संयोजिका प्रणाली खत्री, केतकी गाला, तुषार मुखर्जी तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी उत्तम नियोजन करून स्पर्धा व बक्षिस समारंभ सुयोग्य रितीने पार पाडला. उपस्थित पालकांना प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. बालकांमध्ये बालपणीच नीतिमूल्यांची रूजवण व्हावी, भारताचे आधारस्तंभ सुसंस्कृत असावेत यासाठी प्रतिष्ठान कार्यरत आहे, आपणही या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षिस समारंभाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. `श्रीमन नारायण नारायण नारायण’ या गीताने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.
