00000
कासा : डहाणू तालुक्यासासह तलासरी तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया विधानसभा निवडणुकीमुळे अर्धवट राहिल्याने तालुक्यातील बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आरोग्य तपासणी, पोषण आहार, तसेच पोलिओसारख्या लसीकरण मोहिमांसाठी मदतनीस अत्यंत महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मात्र, सध्या 53 मदतनीस पदे रिक्त असल्याने मुख्य सेविकांवर प्रचंड कामाचा ताण पडत आहे. तसेच डहाणू तालुक्याच्या पूर्वेकडील कासा बालविकास प्रकल्पाअंतर्गत मदतनीस ची 83 पदे व अंगणवाडी सेविकेची 3 पदे रिक्त असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांकडून देण्यात आली. यामुळे अंगणवाडीतील कामकाज विस्कळीत होत आहे. तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठी अपुरी मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. तसेच बालकांच्या आरोग्य तपासणी व लसीकरण कार्यक्रम वेळेवर होण्यात अडथळे येत आहेत.
मदतनीस पदांची भरती करण्याची मागणी
पालकांच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात येत आहे की, लवकरात लवकर मदतनीस पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करून अंगणवाड्यांचे कामकाज सुरळीत करावे. ही भरती प्रक्रिया रखडल्यामुळे बालकांच्या आरोग्यासंबंधी होणार्‍या समस्या वाढत चालल्या आहेत. तालुक्यातील पालकांचा संताप वाढत असून, संबंधित अधिकार्‍यांनी या प्रक्रियेबाबत त्वरित पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. अंगणवाडी सेवांचा दर्जा राखण्यासाठी व कुपोषणाची समस्या टाळण्यासाठी ही भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
कोट
विधानसभा निवडणुकी दरम्यान अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया स्थगिती देण्यात आल्याने, या संदर्भात लवकरच शासन निर्णय आदेश आल्यावर रिक्त पदांची भरती होईल.
उज्वला नांगरे, बाल विकास परियोजना प्रकल्प अधिकारी तलासरी.
कोट
मदतनीस आणि मुख्य सेविका यांच्यावर जास्तीची जबाबदारी आल्याने गरोदर माता, बालक यांच्या आरोग्य, पोषण आहार यावर परिणाम होत आहे. लवकरात लवकर भरती प्रक्रिया करून कामकाज सुरळीत करावे.
स्वपन्ना भूरकुड, माता (गृहिणी)
कोट
कासा बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मधील 83 मदतनीस व 3 अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत. शासन आदेश आल्यास ही रिक्त पदे तात्काळ भरण्यात येतील.
इंदुमती सावंत, बालविकास प्रकल्प अधिकारी कासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *