नवी मुंबई: नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने विशेषत्वाने पावसाळी कालावधीत समुद्राच्या भरतीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी सिडकोने नवी मुंबई वसविताना डच पध्दतीने धारण तलावांची (होल्डींग पाँड) रचना केली आहे. बेलापूर, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली विभागांमध्ये 11 होल्डींग पाँड तयार करण्यात आले असून सेक्टर 12 बेलापूर व सेक्टर 8 वाशी येथे होल्डींग पाँडलगत पर्जन्य जलउदंचन केंद्र बांधलेले आहेत. तुर्भे सेक्टर 21 एपीएमसी मार्केटजवळही पर्जन्य जलउदंचन केंद्र कार्यरत असून हे केंद्र परिसरातील सखल भागातील पावसाळी पाणी निचरा होण्याकरिता उपयुक्त आहे.
उर्वरित होल्डींग पाँडच्या ठिकाणी फ्लॅपगेट बसविण्यात आले असून ते खाडीच्या दिशेने उघडतात. ज्यावेळी खाडीत भरतीची वेळ असेल आणि त्याचवेळी मोठया प्रमाणात पाऊस पडत असेल तर हे फ्लॅपगेट खाडीच्या पाण्यातील दबावामुळे बंद होतात व पावसाचे पाणी होल्डींग पाँडमध्ये साठून राहते आणि शहरात शिरत नाही. ज्यावेळी ओहोटी सुरु होते तेव्हा होल्डींग पाँडमध्ये साठलेल्या पावसाळी पाण्याच्या दबावामुळे फ्लॅपगेट खाडीच्या दिशेने उघडतात व होल्डींग पाँडमधील साठलेले पावसाळी पाणी खाडीमध्ये वाहून जाते. अतिवृष्टी होत असेल अशावेळी पर्जन्य जल उदंचन केंद्रामधील पंपाव्दारे पावसाचे पाणी उचलून खाडीमध्ये सोडण्यात येते.
तथापि पावसाळ्यात ज्या होल्डींग पाँडमुळे नवी मुंबई शहराचे पावसाळी पाण्यापासून संरक्षण होते, अशा होल्डींग पाँडची पावसाचे पाणी धारण करण्याची क्षमता ही इतक्या वर्षात त्यामध्ये मोठया प्रमाणात गाळ साचल्याने व पाण्यात वाहत आलेल्या खारफुटींचीही वाढ झाल्याने मोठया प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे मागील काही वर्षात उधाण भरतीची वेळ व मोठया पर्जन्यवृष्टीची वेळ जुळून आल्यास होल्डींग पाँडची पावसाळी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी झाली असल्याने ते पाणी शहराच्या सखल भागात जमा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
याकरिता सदर होल्डींग पाँड गाळ काढून स्वच्छ करणे व त्याची पाणी धारण क्षमता वाढविणे हा उपाय असून याकरिता परवानगी मिळावी यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
यावर्षीही पावसाळी कालावधीत 21 जुलै 2024 रोजी दुपारी अतिवृष्टी आणि उधाण भरती यांचा कालावधी जुळून आल्याने शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विविध ठिकाणांना भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व आपत्कालीन मदतकार्याला गती दिली. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची स्थलदर्शक पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधत पाणी साचण्याची कारणमीमांसा जाणून घेतली.
त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्वरित आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नमुंमपा पर्यावरण विभागामार्फत आयआयटीमधील तज्ज्ञांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली व या तज्ज्ञांनीही पाणी साचलेल्या ठिकाणांची व त्या परिसरातील नाले आणि होल्डींग पाँडची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीमध्ये आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने होल्डींग पाँड स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन व ते तातडीने करण्याची आवश्यकता बघून महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ प्रा.व्ही.ज्योती प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांची विशेष समिती दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी गठीत करण्यात आली. यामध्ये नवी मुंबई शहर वसविणाऱ्या सिडको महामंडळाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला. नवी मुंबई शहरातील होल्डींग पाँडची पाणी धारण क्षमता पूर्ववत करण्याकरिता मार्ग काढण्यासाठी या सल्लागार समितीच्या तीन बैठका आयुक्त महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या असून या कामाला गती देण्यात येत आहे.
होल्डींग पाँडची गाळ काढून स्वच्छता करणे ही बाब मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या पटलावर असून आयआयटी मुंबई आणि सलीम अली पक्षी विज्ञान व प्रकृती विज्ञान केंद्र यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी हे काम तांत्रिक प्रकारचे विशिष्ट स्वरूपाचे असल्याने तसेच होल्डींग पाँडची साफसफाई व पुनरुत्थान करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करावयाची असल्याने यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे.
सदर कार्यवाही जलद करुन घेण्याकडे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून शहर अभियंता विभागामार्फत कालबध्द कार्यवाही करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे. नवी मुंबईचे सुरक्षा कवच मानले जाणारे होल्डींग पाँड हे सागरी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता स्वच्छ व्हावेत व नवी मुंबईकर नागरिकांना पावसाळी काळात अतिवृष्टीच्या वेळी होणारा त्रास होऊ नये याकरिता महानगरपालिकेच्या वतीने जलद पावले उचलण्यात येत आहेत.
