सीरियामधील बंडखोरांनी वायव्येकडील इडलिबमधील तळावरून अचानक मोहीम सुरू केली आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची जुलमी राजवट संपुष्टात आली. त्यांच्यामुळे सीरियात गृहयुद्ध सुरू झाले, त्यात पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले आणि सहा लाख लोक विस्थापित होऊन निर्वासित झाले. असद यांनी रशिया आणि इराणच्या मदतीने सत्ता टिकवली. मात्र आता त्यांच्या राजवटीचा निर्णायक पाडाव झाला आहे.

एका पंधरवड्यापूर्वी, बंडखोरांनी सीरियाच्या वायव्येकडील इडलिबमधील तळावरून अचानक मोहीम सुरू केली, तेव्हा सीरियातील कोणीही बशर-अल-असादच्या पतनाबद्दल विचारही करत नव्हते. वडील हाफेज अल-असद यांच्या निधनानंतर बशर अल-असद 2000 मध्ये सत्तेवर आला. हाफेजने 29 वर्षे सीरियावर राज्य केले. त्याचा राज्यकारभारही त्याचा मुलगा असदच्या शासनाप्रमाणे हुकूमशाहीचाच होता. म्हणजेच बशर-अल-असाद यांना दमनकारी राजकारणाचा वारसा लाभला होता. असद आपल्या वडिलापेक्षा वेगळा वागेल, अशी अपेक्षा होती; पण ही आशा फार काळ टिकू शकली नाही. 2011 मध्ये सिरियाच्या राजवटीच्या विरोधात शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांना निर्दयपणे दडपून टाकणारा माणूस म्हणून बशर अल-असद नेहमीच लक्षात राहिला. त्याच्या निर्णयामुळे सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू झाले, त्यात पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले आणि सहा लाख लोक विस्थापित होऊन निर्वासित झाले. बशर अल-असद याने रशिया आणि इराणच्या मदतीने विरोधकांना चिरडून आपली सत्ता टिकवली. रशियाने सीरियामध्ये जोरदार हवाई हल्ले केले. इराणने आपले लष्करी सल्लागार सीरिया आणि हिजबुल्लाला पाठवले तर शेजारच्या लेबनॉनमध्ये त्याला पाठिंबा असलेल्या सशस्त्र गटाने आपले प्रशिक्षित सैनिक सीरियामध्ये लढण्यासाठी पाठवले. या वेळी मात्र स्वतःच्या समस्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी सीरियाला वाऱ्यावर सोडून दिले. या पार्श्वभूमीवर विरोधक ‌‘हयात तहरीर अल-शाम‌’ (एचटीएस) च्या नेतृत्वाखालील बंडखोरांना रोखण्यास सीरियन सैन्य अक्षम होते. म्हणूनच त्यांनी फारशा विरोधाशिवाय राजधानी दमास्कस तसेच देशातील दुसरे सर्वात मोठे शहर अलेप्पो ताब्यात घेतले तर असद यांनी रशियात आश्रय घेतला.
दमास्कस हे असदच्या सत्तेचे केंद्र. आता, सीरियातील असद कुटुंबाची पाच दशकांची राजवट संपुष्टात आल्याने या प्रदेशातील सत्तेचा समतोल बदलू शकेल. सीरियातील घटनेनंतर इराणला मोठा फटका बसत आहे. बशर-अल-असदच्या शासनाखालील सीरिया हा इराण आणि हिजबुल्ला यांच्यातील संबंधाचा एक भाग होता. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे होते. इस्रायलबरोबरच्या युद्धानंतर हिजबुल्ला खूपच कमकुवत झाली आहे आणि तिचे भविष्य अनिश्चित आहे. हुथी हा आणखी एक इराणसमर्थित गटदेखील येमेनमध्ये हवाई हल्ल्यांचे लक्ष्य बनला आहे. या गटांशिवाय इराकमध्ये कार्यरत असलेले सशस्त्र गट आणि गाझामधील हमाससारख्या गटांचे गंभीर नुकसान झाले आहे. सीरियातील नवीनतम हल्ला तुर्कस्तानच्या आशीर्वादाशिवाय शक्य झाला नसता, असे काहींना वाटते. असे असले तरी, काही सीरियन बंडखोर गटांना पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानने ‌‘एचटीएस‌’ला पाठिंबा नाकारला आहे. काही काळापासून, तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान हे बशर अल-असद यांच्याशी संघर्षावर मुत्सद्दी तोडगा काढण्यासाठी चर्चेत गुंतण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे सीरियन निर्वासितांना परत येण्याची परवानगी मिळेल, असा त्यांचा होरा होता; पण असद यांनी तसे करण्यास नकार दिला. आज किमान तीन दशलक्ष सीरीयन निर्वासित तुर्कस्तानमध्ये आहेत. ‌‘एचटीएसची मुळे ‌‘अल-कैदा‌’शी जोडलेली आहेत आणि त्यांचा भूतकाळ अतिशय हिंसक आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून या गटालापुन्हा राष्ट्रवादी शक्ती म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत आहे.
त्याच वेळी, सीरियामध्ये नाट्यमय शासनबदलामुळे राजवटीच्या शीर्षस्थानी एक पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे अराजकता वाढून अधिक हिंसाचार होऊ शकतो. एचटीएसने अध्यक्ष बशर अल-असद याच्या राजवटीचा पाडाव आणि दमास्कस ताब्यात घेण्याची घोषणा केल्यानंतर त्याचा म्होरक्या अबू मुहम्मद अल-जुलानीची ओळख आणि भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. जुलानीचे खरे नाव अहमद हुसैन अल-शरा आहे. त्याला ‌‘अबू मुहम्मद अल-गोलानी‌’ म्हणूनही ओळखले जाते. जुलानीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात इराकमधील ‌‘अल-कैदा‌’मधून केली होती. त्याने नंतर ‌‘अल-कैदा‌’चा नेता अयमान अल-जवाहिरी याच्याशी निष्ठेची शपथ घेतली. 2012 मध्ये, जुलानीने अल-नुसरा फ्रंट नावाची संघटना स्थापन केली आणि असद सरकार उलथून टाकण्याची शपथ घेतली. यानंतर जुलानीच्या नेतृत्वाखाली ‌‘अल-नुसरा फ्रंट‌’ने संघटनेचे नाव बदलून ‌‘जभत फतह अल-शाम‌’ असे केले. त्यानंतर 2017 मध्ये ते एचटीएस असे करण्यासाठी इतर कट्टरवादी गटांमध्ये विलीन झाले. ‌‘एचटीएस‌’ आता सीरियातील सर्वात प्रभावशाली बंडखोर गटांपैकी एक आहे आणि त्याच्यावर थेट जुलानीचे नियंत्रण आहे. अबू मोहम्मद अल-जुलानीला 2013 मध्ये अमेरिकेने ‌‘विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी‌’ म्हणून घोषित केले होते. यासोबतच जुलानीवर दहा दशलक्ष डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आले होते. 2013 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याचा समावेश प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत केला होता.
असदचे सैन्य युद्धामुळे कमकुवत झाले होते आणि त्यांचे बरेचसे सैनिक लढायला तयार नव्हते. रशिया, इराण आणि हिजबुल्लाह सारखे मित्र या वेळी मदत देऊ शकले नाहीत. कारण ते स्वतःच्या संघर्षात मग्न होते. सीरियामध्ये जुलानीने नव्या युगाची सुरुवात जाहीर केली आहे. या यशामुळे ‌‘एचटीएस‌’ने सीरियामध्ये आपली पकड मजबूत केली आहे. असाद राजवटीचे पतन हा रशिया आणि इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता जुलानीचे पुढचे पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो आपली शक्ती बळकट करण्यावर भर देतो की आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सुरक्षेतील नवी आव्हाने मांडतो हे पहायचे आहे. इस्लामिक बंडखोरांच्या ताब्यात गेल्याने सीरियाच्या भविष्याबद्दल जगभरात अनिश्चितता आणि चिंता आहे. सत्तापालटानंतर सीरियामध्ये दहशतीचे वातावरण आहे. सीरियावर 53 वर्षांहून अधिक काळ अल-असद कुटुंबाची सत्ता आहे. सीरियन लोकांनी सुमारे 14 वर्षांपूर्वी अशीच शांततापूर्ण निदर्शने केली; परंतु त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्याचे रूपांतर रक्तरंजित गृहयुद्धात झाले. अशा स्थितीत आठवडाभरापूर्वीपर्यंत सीरियातील बहुतांश भागांवर ताबा मिळवणाऱ्या अल-असद कुटुंबाचा इतक्या लवकर अंत कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीरियन आर्मीने घोषित केले आहे की ते काही प्रांतांमध्ये आणि जवळच्या स्विडामध्ये आपली उपस्थिती मजबूत करत आहे; परंतु हे सर्व व्यर्थ ठरले आहे.
दरम्यान, ‌‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स‌’ने दिलेल्या माहितीनुसार सीरियन सैन्याने इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सजवळील कुनेत्रातील स्थानांवरून माघार घेतली आहे. सीरिया आधीच संघर्ष करत होता. त्याची अर्थव्यवस्था कोलमडत होती. सरकारविरोधी घटक कॅप्टॅगॉन या सायकोॲक्टिव्ह ड्रगच्या अवैध व्यापारातून देशभर पैसे कमवत होते. असद संपूर्ण देशात अत्यंत तिरस्काराचा धनी झाला होता. कारण लोकांचे जगणे कठीण होत होते. यामध्ये सीरियन आर्मीच्या सैनिकांचाही समावेश होता. ते सरकारच्या या वृत्तीवर खूश नव्हते. बहुतेक सैनिकांना अल-असदसाठी लढायचे नव्हते. बंडखोर पुढे येण्याआधीच सैनिक आणि पोलिस अधिकारी आपली पोस्ट सोडून, शस्त्रे समर्पण करुन पळून जात होते. अल-असदची राजवट कमकुवत होती. ती रशिया आणि इराणच्या लष्करी मदतीवर अवलंबून होती; परंतु रशिया युक्रेनविरोधातील युद्धात आणि इराण इस्त्रायलविरोधातील युद्धात गुंतला होता. त्यामुळेच खचलेल्या सीरियन सैन्याच्या मदतीसाठी ते पुढे येऊ शकले नाहीत. अल-असदच्या जाण्याच्या घोषणेनंतर दमास्कस, होम्स आणि इतर सीरियन शहरांमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. क्रांतीचा झेंडा फडकवणाऱ्या गर्दीत लोक आनंदाने टाक्यांवर चढले. काही ठिकाणी लोकांनी अल-असदचे वडील हाफेज यांचे पुतळे पाडले. मशिदींमध्ये जमाव एकत्र प्रार्थना करण्यासाठी आणि सार्वजनिक चौकांमध्ये उत्सव साजरा करण्यासाठी जमले. असदविरोधी घोषणा देत आणि कारचे हॉर्न वाजवत लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. आता सीरिया बदलाच्या एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *