अशोक गायकवाड
रायगड : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार सुनिल तटकरे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित विविध शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सत्यजित बडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग जगदीश सुखदेवे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, जिल्ह्यात असलेल्या दिव्यांग, अपंग व्यक्तींना त्यांची तपासणी करुन आवश्यक असलेले साहित्य, उपकरणे यांचा पुरवठा करण्यात यावा. तसेच वयोश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६५ वयोमर्यादेवरील ज्येष्ठ नागकांसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करुन त्यांची योग्य ती तपासणी करावी. शहरी भागातील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय तर ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिबिरांचे आयोजन करावे. वयोश्री योजनेंतर्गत शिबिरांचे कामकाज दि.१५ ते दि.२० जानेवारी २५ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या. तसेच केंद्र शासनाच्या असलेल्या वयोश्री योजनेमधून तपासणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य, उपकरणे देण्यात असावी. तर राज्य शासनाच्या असलेल्या वयोश्री योजनेमधून तपासणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना रु.३ हजार देण्यात यावे. तालुका निहाय शिबिरांचे आयोजन करताना तेथील लोकप्रतिनिधींनाही कळविण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या वयोश्री योजनेकरिता आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धतता करुन दिली जाईल. शिबिरांमध्ये तपासणी केलेल्या नागरिकांची योग्य रितीने तपासणी करुन त्या प्रत्येकांची नोंद जतन करुन ठेवावी. जिल्ह्यातील बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांकरिता दिलेले उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे. तसेच शेतकऱ्यांना खरीब व रब्बी पिकांसाठी आवश्यक असलेल्या कर्ज प्रकरणांची कार्यवाही तातडीने करुन शेतकऱ्यांना कर्ज विहित वेळेत कसे मिळेल ते पाहावे. ज्या बँकांचे पिक कर्ज वाटपाचेप्रमाण कमी आहे. त्या बँकांच्यावर कायदेशीर कारवाही करण्याचा इशारा खासदार सुनिल तटकरे यांनी बँकांना दिला. बँकांनी संवेदनशील होऊन त्यांच्याकडे असलेली विविध केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास बँकांनी चालढकल केल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची माहिती नावांसह सादर करावी, अशा सूचना संबंधित बँक अधिकाऱ्यांना दिल्या. विविध विभागांच्या कामांचा आढावा घेताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, केंद्रांची पंतप्रधान ग्रामसडक योजना व राज्याच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. सन-२०२४-२५ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असलेली कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण करीत असताना केलेल्या कामांचा दर्जा, गुणवत्ता चांगली असली पाहिजे. रोहा-अलिबाग रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधी उपलब्ध करुन दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *