पालघर : जव्हारचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांनी नियम डावलून समायोजन प्रक्रिया विभागून राबविली तसेच काही मर्जीतील शिक्षकांना प्रतिनियुक्ती केली, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करू अशी भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे. मार्च २०२४ दरम्यान सुरू असलेल्या परीक्षेच्या काळात जिल्ह्यातील फक्त जव्हार तालुक्यातील शिक्षकांचे समायोजन करण्यात आले होते.
समायोजनासाठी पात्र असणाऱ्या १६ पदवीधर शिक्षकांपैकी आठ शिक्षकांना तालुक्याबाहेर जावे लागेल, असे सूचित करण्यात आल्याने त्यांनी या प्रक्रियेतून माघार घेऊन (रिव्हर्शन) पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंत शिक्षण घेण्यास अनुकूलता दर्शवली होती. तर उर्वरित आठ पदवीधर शिक्षकांचे मार्च महिन्यात समायोजन न करता त्यांना मूळ शाळेत थांबून त्यांचे समायोजन ७ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. असे करताना शिक्षकांच्या सोयीनुसार शाळा देण्यात आल्या, मर्जीतील शिक्षकांना आवडत्या शाळेवर तोंडी आदेश देऊन प्रतिनियुक्ती करण्यात आली अशा स्वरूपाची तक्रार गजानन सहाणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे एकाच वेळी समायोजन न करता काहींना मार्च २०२४ मध्ये तर आठ शिक्षकांना ऑक्टोबर २०२४ मध्ये समायोजन करताना पती-पत्नी एकत्रित करण्याचा लाभ दिला नसल्याचे आरोप देखील करण्यात आले आहेत. त्याचबरोबरीने काही शिक्षकांच्या बदल्या नियम डावलून जव्हार तालुक्याबाहेर करण्यात आल्या, अशा तक्रारी उल्लेखित आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी पुंडलिक चौधरी यांनी तोंडी आदेशाद्वारे प्रतिनियुक्ती केल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षात घेता सोयीसाठी अवेळी समायोजन केल्याचे मान्य केले. या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे सांगितले
कोट
जव्हार तालुक्यातील विविध शाळांमधील परिस्थिती पाहता पालघर जिल्हा परिषद, शालेय व्यवस्थापन समिती, पंचायत समिती अंतर्गत शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत या उद्देशाने काही निर्णय घेण्यात आले.
– पुंडलिक चौधरी, तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जव्हार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *