बीडमधील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या विषयावरून विरोधकांनी राज्य सरकार आणि अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहे. हा गुन्हा जातीयवादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाला नसल्याचे संतोष यांच्या भावाने स्पष्ट केले असले, तरी आता बीडमध्ये या प्रकरणाला मराठा विरुद्ध वंजारी असे जे स्वरुप आले आहे, ते सामाजिक वीण उसवणारे आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून मराठा आणि वंजारी समाजातील दरी रुंदावत चालली आहे. अगोदरच मराठा आणि वंजारी समाजात परस्परांविषयी गैरसमज वाढत असताना आता देशमुख यांच्या हत्येत मुंडे यांचे व्यावसायिक भागीदार वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे मुंडे अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र अजूनही उद्योजकतेत आघाडीवर आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीत आघाडीवर असला, तरी उद्योजकांत अधूनमधून स्थानिक गुंडगिरीची जी दबक्या आवारात चर्चा आहे, ती आता उघड उघड व्हायला लागली आहे. एकीकडे उद्योजकांना पायघड्या घालायच्या आणि दुसरीकडे ते यायला तयार झाले, तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेत्यांपासून उद्योग मंत्रालयापर्यंत लूटमारीची साखळी तयार झाली आहे. स्थानिक राजकारणी, कामगार नेते, स्थानिक ठेकेदार उद्योजकांना खंडण्या मागायला लागतात. कामगार, विटा, सिमेंट आदी आमच्याकडून घ्यायचे, असा दंडक घातला जातो. दरही तेच ठरवतात. कंपन्यातील कामगार वाहतुकीतीसाठी प्रवाशी वाहतुकीच्या बसही संबंधित गावगुंडांच्याच घ्यायला भाग पाडल्या जातात. आता उद्योजकांना लुटण्याचे हे लोण ग्रामीण भागातही पोचले आहे. एकीकडे अशा गावगुंडांच्या टोळ्या आणि खंडणीला वैतागून आता चाकण, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, सिन्नर आदी भागातील उद्योग इतरत्र स्थलांतरित व्हायला लागले आहेत. तीन पक्षांच्या सरकारमधील काही पदाधिकारी, मंत्री उद्योजकांना कसे अडचणीत आणतात, याच्या कितीतरी कहाण्या सांगितल्या जात असतात. बीडमध्ये आधीच उद्योग फारसे नाहीत. सहकारी साखर कारखानेही नीट चालत नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातला कारखान्यांना ऊसतोडणी मजूर पुरवणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. खरेतर वंजारी समाजातील गोरगरीबांचा त्यात जास्त समावेश आहे. ही अभिमानाची बाब नाही. वर्षानुवर्षे नेतृत्व करणाऱ्या बीडच्या नेत्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. असे असताना सौरऊर्जेच्या निमित्ताने बीडमध्ये काही गुंतवणूक होत असेल आणि त्यात अशा खंडणीचे प्रकार होत असेल, तर उद्योजकांमध्ये वेगळा संदेश जाईल.
बीडच्या सरपंचांच्या निमित्ताने उद्योगातील खंडणी आणि त्याचे राजकीय नेत्यांशी संबंध याची चर्चा होत असली, तरी नाशिक, पुणे तसेच अन्य ठिकाणी यापूर्वी खंडणीसाठी कामगार नेते, उद्योजकांच्या झालेल्या हत्यांना यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे. अन्य ठिकाणीही राजकीय नेत्यांचा अप्रत्यक्ष खंडणीशी संबंध असतो. काहींचा तर काटा काढण्यात ही हात असतो; परंतु बीडच्या निमित्ताने खंडणीसाठी सरपंचांचा खून करण्यात मुंडे यांच्या व्यावसायिक भागीदार असलेल्या कराड यांचे नाव थेट खून प्रकरणात घेण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षचाही खून प्रकरणात हात असून, त्याची पवार यांनी उचलबांगडी करण्यात आली आहे. बीडमधील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड कराड असल्याचे आरोप होत आहेत. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील शस्त्रधारकांची यादीच समोर आणली आहे. बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक आहेत. परभणीत 32, तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने अधिकृत शस्त्र परवाने दिले जातात, असा प्रश्न उपस्थित होतो. अनधिकृत शस्त्रास्त्रे किती असा प्रश्न उपस्थित होतो. कराड यांच्या नावावर लायसन्स आहे; पण त्यांच्याच गटातले कैलास फड व निखील फड या दोघांकडे कोणताही शस्त्रास्त्र परवाना नाही.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शस्त्रास्त्रे परवाने आणि बीडमधील गुन्हेगारीचा संबंध अधोरेखित केला. कराड याच्यावर फक्त परळीत दहा गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणाऱ्या मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर अखेर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून समोर आला आहे. दमानिया यांनी हा व्हिडीओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरून प्रश्न उपस्थित केले होते. देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील दहशत आणि बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा समोर आला असून बीडचा बिहार होत असल्याची टीकाही केली जात आहे. राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही बीडसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. बीडमधील दहशत, बीडमधील गुंडागर्दी आणि बीडमधील बंदुकधारी तरुणाईचा प्रश्न जटील बनल्याचे यामुळे समोर आले आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुक मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती. विरोधकांनी यासंबंधी टीकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिस उपमहानिरीक्षकस्तरीय विशेष तपास पथक व न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. मुंडे व कराड यांच्यातील जमिनीच्या व्यवहाराचे सातबारेही समोर आले आहेत. या सातबाऱ्यांत ‘जगमित्र शुगर्स’चे 6 सातबारे असून त्यात मुंडे व कराड यांची संयुक्त मालकी असल्याचे नमूद आहे.