ठाणे : युग पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गोविंद पाटील एकादश संघाने सदाशिव सातघरे एकादश संघावर २४ धावांनी सरशी मिळवत ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कायम राखले. सदाशिव सातघरे एकादश संघाला १५८ धावांवर रोखल्यावर गोविंद पाटील एकादश संघाने ७ बाद १८२ धावांवर डाव घोषित करून सामन्यात वर्चस्व मिळवले होते.
प्रथम फलंदाजी करताना वेदांत नार्वेकर (३७) आणि अद्विक मंडलिकच्या २८ धावांमुळे सदाशिव सातघरे एकादश संघाला दिड शतकी धावसंख्या उभारता आली. दिक्षांत पाटीलने २६ धावांत ५ बळी मिळवत सदाशिव सातघरे एकादश संघाला मर्यादित धावसंख्येवर रोखले. युग पाटील, हर्ष खानविलकर आणि यश म्हात्रेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. फलंदाजीत युग पाटीलने नाबाद ५०, हर्ष नाडकरने ४५ आणि अन्वय मंडलिकने ४२ धावांची खेळी करत संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीत उपयुक्तता सिद्ध करताना अद्विक मंडलिकने पाच बळी मिळवले. अमोघ पाटीलने दोन बळी मिळवले. दुसऱ्या डावात सदाशिव सातघरे एकादश संघाची कामगिरी खराब झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सदाशिव सातघरे एकादश संघाची २१ षटकात ३ बाद ६२ धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : सदाशिव सातघरे एकादश संघ : (पहिला डाव ) ६७.२ षटकात सर्वबाद १५८ (वेदांत नार्वेकर ३७, अद्विक मंडलिक २८, दिक्षांत पाटील २०-९-२६-५,युग पाटील १२.२-१-४९-१, हर्ष खानविलकर ११-५-१७-१, यश म्हात्रे ५-१-१०-१) विरुद्ध गोविंद पाटील एकादश संघ :(पहिला डाव) : हर्ष नाडकर ४५, युग पाटील नाबाद ५०, अन्वय जोशी ४२, अद्विक मंडलिक २०-३-५६-५, अमोघ पाटील ९.१-३-१२-२). सदाशिव सातघरे एकादश संघ : (दुसरा डाव ) : २१ षटकात ३ बाद ६२ ( अन्मय म्हात्रे २३, हर्ष नाडकर ४-९-२, यश म्हात्रे ४-२१-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : युग पाटील (गोविंद पाटील एकादश संघ).
0000
