ठाणे : शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपातत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरळ सेवेच्या संवर्गातील अनुकंपासाठी उपलब्ध असलेल्या पदांवर नियुक्ती देण्यात येते. त्याअनुषंगाने अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या पदांवर अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील एकूण ९ अनुकंपा धारकांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार जिल्हा परिषदेमधील अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते २३ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या सभागृहात नियुक्ती आदेश देण्यात आले.
अनुकंपातील नियुक्तीसाठी पद उपलब्ध आहेत परंतु अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अनुकंपा धारकांची आवश्यक शैक्षणिक अहर्ता नसल्याने आरोग्य सेविका या संवर्गातील पद रिक्त आहेत, यासाठी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील महिला अनुकंपाधारकांचा मेळावा घेऊन त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात यावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच नियुक्त झालेल्या सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले व ग्रामीण भागात काम करण्यासाठी तुमचे योगदान मोलाचे ठरणार असून उत्तम कामकाज करावे अशा सदिच्छा दिल्या. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवने तसेच सामान्य प्रशासन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पशुधन पर्यवेक्षक – १, आरोग्य पर्यवेक्षक – १, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – १, आरोग्य सेवक – १, ग्रामसेवक -१, वाहन चालक – १, शिपाई -३ अशा एकूण ०९ पदासाठी अनुकंपा धारकांना त्यांच्या शैक्षणिक अहर्ते नुसार नियुक्ती देण्यात आली. २०२३ रोजी अखेर प्राप्त झालेल्या अनुकंपा प्रस्तावाची अंतिम प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करून यादीतील जेष्ठतेनुसार व शैक्षणिक अहर्तेनुसार अनुकंपाधारकांचे शैक्षणिक कागदपत्र पडताळणी करून अनुकंपा धारकांचे निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर अनुकंपा धारकांच्या प्राप्त झालेल्या हरकतींचे निराकरण करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. वेळोवेळी याविषयाचा पाठपुरावा करून दि. 23 डिसेंबर, 2024 रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी दिली.
