अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही

 

उल्हासनगर: उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शुक्रवारी सहा ते सात तास अंधारात होते. वीज नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. शुक्रवारी महावितरणाकडून स्थानिक परिसरात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होता. तर रुग्णालयातील पर्यायी वीज व्यवस्थाही त्याचवेळी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. एकाच दिवशी दोन्ही यंत्रणा बंद असल्याने रुग्णांचे मात्र हाल झाले. यादरम्यान अनेक शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या. यापूर्वीही रुग्णालय अंधारात गेल्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होतो आहे.
शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. या काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू राहतो. मात्र शुक्रवारी काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले होते. परिणामी संपूर्ण रुग्णालयाचा वीज पुरवठा १२ वाजल्यापासून खंडित झाला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला होता. वार्डातले दिवे, पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. सुदैवाने अतिदक्षता विभागात पर्यायी व्यवस्था असल्याने यंत्रणा सुरू होती मात्र या काळात रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि प्रसूती बंद ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली. एखादी तातडीची शस्त्रक्रिया करायची असल्यास आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे शस्त्रक्रिया करतो, अशी माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली.
अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय
उल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय तीन ते चार तालुक्यांसाठी महत्त्वाचे आहे. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. आधीच खाटा नसल्याने येथे रुग्णांना खाली झोपवून उपचार घ्यावे लागत असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. त्यात आता या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यापूर्वीही वीज पुरवठा बंद
गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्याचा रुग्णालयातील रुग्णांना मोठा फटका बसला होता. ऐन उन्हाळ्यात तापमान वाढलेले असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची लाही लाही झाली होती. त्याचवेळी अनेक विभाग बंद झाले होते. शुक्रवारी अशाच प्रकारे शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांचे हाल झाले. रुग्णालय प्रशासन याबाबत नियोजन केल्याचे सांगत वेळ मारून नेत असले तरी रुग्णांचे मात्र या काळात हाल झाले.
900000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *