ठाणे : ग्रंथाली वाचक दिनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांसह ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला तीन हजाराहून अधिक ठाणेकरांनी भेट दिली. तर, दोन हजार पुस्तकांची या प्रदर्शनात विक्री झाली. यात सर्वाधिक चरित्र ग्रंथ, कविता संग्रह आणि वैचारिक विषयावरील पुस्तकांना ठाणेकरांनी सर्वाधिक पसंती दिल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
ग्रंथालीचा सुवर्णमहोत्सवी वाचकदिन ठाण्यातील तीन हात नाका येथील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडला. २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वाचकदिननिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर, डोंबिवलीतील पै फ्रेण्डस ग्रंथालयाच्या वतीने याठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथाली,राजहंस, ज्योत्स्ना, परममित्र, पॉप्युलर, उधवेली, व्यास क्रिएशन, रोहन, मनोविकास यांसारखे आणखी काही प्रकाशनाचे पुस्तक मांडण्यात आली होती. त्यामुळे वाचक आवडीच्या पुस्तकांची निवडत करताना तासनतास पुस्तकात रमलेले दिसून आले.
चरित्र ग्रंथ, काव्य संग्रह आणि वैचारिक विषयावरील पुस्तक खरेदी करण्याकडे वाचकांचा ओढा सर्वाधिक होता. तर, लेखक अरुण पुराणिक आणि कथाकार किरण येले यांच्या पुस्तकांची या प्रदर्शनात जास्त संख्येने विक्री झाली, अशी माहिती पै फ्रेण्डस ग्रंथालयाच्या वतीने मिळाली. तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला तीन हजार वाचकांनी भेट दिली. त्यासह, पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. १००० हून अधिक पुस्तकांचे आदान प्रदान याठिकाणी करण्यात आले. तर, जवळपास २००० पुस्तकांची विक्री झाली.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *