क्राँग्रेसची नवी त्रिसुत्री

बेळगावी : क्राँग्रेसने पुढील दोन वर्षासाठीचा रोडमॅप आखला आहे. यापुढे
२७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान  ही कांग्रेसची त्रिसुत्री असले. गाव, ब्लॉक, जिल्हा आणि राज्याराज्यांत ही त्रिसुत्री राबविण्यात येईल. या अभियानाचे नेतृत्व राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व करणार असल्याचेही वेणुगोपाल यांनी सांगितले. संविधानावरील हल्ला, संविधानाच्या मूल्यांचा ऱ्हास, महागाई आणि भ्रष्टाचार यासारखे लोकांचे प्रश्न या अभियानाद्वारे मांडणार आहोत, २६ जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी महु येथे विशाल रॅलीने त्याच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. असेही ते म्हणाले.

संविधानावरील कथित हल्ला तसेच महागाई आणि भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या चिंता यासारखे मुद्दे उपस्थित करून सरकारविरोधात रान उठविण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी पदयात्रेसह १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा केली. पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असून ही प्रक्रिया लगेच सुरू होईल आणि पुढील वर्षभर चालेल.

काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीच्या म्हणजेच नव सत्याग्रह बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. त्यातील एक महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय होता. पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते “ऐतिहासिक” बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा उपस्थित होते.
महात्मा गांधीजींच्या विचारांवर पंतप्रधान, गृहमंत्री,भाजप व आरएसएसकडून हल्ले होत आहेत. यामुळे गुजरातमध्ये एप्रिल महिन्यात काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला विस्तारित कार्यकारिणीचे देशभरातील १३२ सदस्य उपस्थित होते.त्यापैकी ५० जणांनी चर्चेत भाग घेतला. अध्यक्ष खर्गे व राहुल गांधी यांनी सखोल विवेचन केले.तब्बल चार तास ही बैठक चालली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे हे अधिवेशन स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *