मनमोहन सिंगांच्या समाधीसाठी जागा द्या,

काँग्रेस अध्यक्षांची पंतप्रधान मोदींना विनंती

 नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉमनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी त्यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे, मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा देण्याची विनंती केली आहे.

मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करणे आणि त्यांचे स्मारक उभारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर बोलून आणि पत्र लिहून केले आहे.

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी काँग्रेस कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सामान्यांना काँग्रेस कार्यालयात मनमोहन सिंग यांचे शेवटचे दर्शन करता येईल. दरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी मनमोहन सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदींनी त्यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान असल्याचे वर्णन केले. तसेच, एक दयाळू माणूस, एक विद्वान अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सुधारणांद्वारे देशाला एका नव्या युगात घेऊन जाणारे नेते, म्हणून त्यांचे स्मरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *