भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महान अर्थतज्ज्ञ, थोर विचारवंत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांनी देशासाठी जे योगदान दिले देश कधीही ते विसरणार नाही. त्यांच्या निधनाने भारताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था मानली जाते. याचे सर्व श्रेय डॉ मनमोहन सिंग यांनाच जाते कारण तीस बत्तीस वर्षापूर्वी ते देशाचे अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी जे क्रांतिकारी निर्णय घेतले त्यामुळेच देशाची अर्यव्यवस्था सुदृढ झाली आहे.
डॉ मनमोहन सिंग हे रूढ अर्थाने राजकारणी नव्हते तरीही त्यांनी समर्थपणे दहा वर्ष देशाचे नेतृत्व केले. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. २६ सप्टेंबर १९३२ रोजी एका गरीब कुटुंबात डॉ मनमोहन सिंग यांचा जन्म झाला. ते लहान असतानाच त्यांचे मातृ छत्र हरपले. घरची परिस्थिती हालाखीची असूनही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी १९५७ साली केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून पहिल्या श्रेणीत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी १९६२ साली ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात डी फिल ही पदवी संपादन केली. उच्च शिक्षण घेऊन ते मायदेशात परतल्या वर त्यांनी पंजाब विद्यापीठ तसेच दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून सेवा केली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती. याच दरम्यान त्यांनी युएनसिटीडी सचिवालयात त्यांनी काम पाहिले. अर्थशास्त्रातील विद्वान व्यक्ती अशी त्यांची ख्याती जगभर पसरू लागली त्यामुळे १९७१ साली त्यांना वाणिज्य मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार ही जबाबदारी देण्यात आली. पुढील वर्षी म्हणजे १९७२ साली त्यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लगार म्हणून नेमणूक झाली. अर्थ विभागाचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. पुढे त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले. १९८७ ते १९९० या काळात त्यांनी जिनिव्हा येथील साऊथ कमिशनचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले.
१९९० पासून भारतीय राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत होत्या. राजकारण अस्थिर झाले होते. विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार पडले होते. चंद्रशेखर हे भारताचे पंतप्रधान बनले होते. भारताची अर्थव्यवस्था बिकट बनली होती. देश चालवण्यासाठी सरकारकडे पैसे नव्हते सरकारी तिजोरीत ठणठणाट होता म्हणून पंतप्रधान चंद्रशेखर यांनी देशाचे हजारो टण सोने जागतिक बँकेकडे गहाण ठेवले होते. केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगातच आर्थिक मंदी आली होती. अनेक देश डबघाईला आले होते अशातच काँग्रेसने चंद्रशेखर यांचा पाठिंबा काढून घेतल्याने लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. निवडणूक प्रचार दरम्यानच राजीव गांधी यांची हत्या झाल्याने काँग्रेसचे सूत्रे पी व्ही नरसिंह राव यांच्याकडे आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने नरसिंह राव पंतप्रधान बनले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच कॅबिनेट सचिव नरेश चंद्र यांनी त्यांना आठ पानांचा अहवाल दिला. या अहवालात देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याचे नमूद करण्यात आले होते. अशा परिस्थितीत राव यांना अशा चेहऱ्याची गरज होती जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि त्यांच्या विरोधकांना भारत आता जुन्या मार्गावर जाणार नाही असा संदेश देऊ शकेल. त्यांनी त्यावेळी त्यांचे सल्लागार पी सी अलेक्झांडर यांना विचारले की अर्थ मंत्रालयासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या व्यक्तींचे नावे सुचवा तेंव्हा पी सी अलेक्झांडर यांनी आय जी पटेल व डॉ मनमोहन सिंग यांची नावे सुचवली. आय जी पटेल यांची आई आजारी असल्याने ते भारतात येऊ शकणार नाही मात्र डॉ मनमोहन सिंग यांना संपर्क केल्यास देशहीतासाठी ते अर्थमंत्री होतील असे पी सी अलेक्झांडर यांनी पंतप्रधानांना सांगितले. लगेचच नरसिंह राव यांनी डॉ मनमोहन सिंग यांच्याशी संपर्क केला आणि तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होताल का ? असे विचारले. मनमोहन सिंग यांनी त्यास होकार दिला आणि डॉ मनमोहन सिंग भारताचे अर्थमंत्री बनले.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरण आणले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारलीच नाही तर ती वेगवान केली. त्या काळात डॉ मनमोहन सिंग यांना जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून संबोधले जात असे. त्यांनी जागतिक बँकेकडे गहाण ठेवलेले सोने परत आणले. देशाच्या तिजोरीत भर घातली. देशात परदेशी गुंतवणूक आणली त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था तर सुधारलीच पण तरुणांना रोजगार देखील मिळाला. त्यांच्या उदारीकरणाच्या धोरणाला जगाने मान्यता दिली म्हणूनच त्यांना जागतिक उदारीकरणाचे जनक असे म्हणतात. १९९६ साली काँग्रेसचे सरकार गेल्यावर ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनले. मे २००४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले त्यावेळी सोनिया गांधी याच देशाच्या पंतप्रधान होतील असे सर्वांना वाटले पण सोनिया गांधींनी आपला आतला आवाज ऐकून पंतप्रधानपद नाकारले आणि डॉ मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले . देशातील एकही व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून त्यांनी अन्न सुरक्षा सारखे महत्वाचे विधेयक आणले. सर्वांना रोजगार मिळावे म्हणून त्यांनी मनरेगा योजना आणली. त्यांच्या पंतप्रधान काळात परराष्ट्राशी भारताचे सौहार्दाचे संबंध होते. त्यांच्याच काळात भारत आणि अमेरिका यांचे संबंध दृढ झाले. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्यानेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी दिली. २००४ ते २०१४ असे सलग दहा वर्ष ते भारताचे पंतप्रधान होते. सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहूनही ते कायम नम्र आणि विनयशील राहिले. अहंकाराचा लवलेशही त्यांना शिवला नाही. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. अर्थशास्त्रावर आधारित ग्रंथ लीहले. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांना अनेक विद्यापीठांनी मानाची डॉक्टरेट दिली. देशाचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मविभूषण त्यांना प्राप्त झाला. त्यांच्या निधनाने देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, थोर विचारवंत, व्यासंगी व्यक्तिमत्त्व, अभ्यासक आणि थोर देशभक्त गमावला आहे. त्यांच्या कामाप्रती असलेला व्यासंगी आणि शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचारणामुळे ते कायम स्मरणात राहतील. डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *