मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. मुंबईवर गुरुवारी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. धुक्यामुळे सकाळीच संध्याकाळ झाल्यासारखा वाटू लागलं होतं. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हळूवार वारा आणि आर्द्रतेमुळे प्रदूषकांचं विसर्जन होऊ शकलं नाही आणि ते वातावरणातच राहिलं. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता २०० ते ३०० एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवली गेली. हवेचा हा दर्जा खराब आणि अत्यंत खराब अशा श्रेणीत येतो.
मुंबईत गुरुवारची सकाळ इतर दिवसांच्या तुलनेत काहीशी वेगळी दिसली. साधारणत: गेल्या काही दिवसांपासून काहीसा सूर्यप्रकाश आणि हलकं धुकं दिसत होतं, मात्र गुरुवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होतं आणि धुक्याची पातळीही अधिक असल्याचं दिसलं.
मुंबईतील प्रदूषणाची पातळी गुरुवारी अधिक होती. धुळीचे कण आणि धुकं एकत्र मिसळल्यानंतर प्रदूषक वातावरणात राहतात. त्यामुळे गुरुवारी मुंबईत दिवसाचं तापमान ३०.५ अंश आणि किमान तापमान १९.१ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
१०० किंवा त्यापेक्षा कमी एअर क्वालिटी इंडेक्स समाधानकारक मानला जातो. मात्र १०० किंवा त्याहून अधिक एअर क्वालिटी इंडेक्स धोकादायक असल्याचं मानलं जातं. मात्र, मुंबईतील अनेक भागात वायू गुणवत्ता १६८ एक्यूआय नोंदवण्यात आला आहे. तर मुंबईतील काही ठिकाणी २०० हून अधिक एक्यूआय असल्याचं समोर आलं आहे.
