पान १ वरुन
सरत्या वर्षात भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात अनेक नवी जहाजे आणि पाणबुड्या समाविष्ट केल्या. ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस अरिहंत’सारख्या स्वदेशी विमानवाहू नौका, अणु पाणबुड्या भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. हद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून भारताने सागरी गस्तींना बळकटी दिली असून मलक्का सामुद्रधुनीत आपली उपस्थिती वाढवली आहे. हीदेखील सरत्या वर्षातील मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. 2024 मध्ये भारताने सायबर सुरक्षा आणि अंतराळ संरक्षणाला प्राधान्य दिल्याचे दिसले. संरक्षण सायबर एजन्सी आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी एकत्रितपणे सैन्याला त्या क्षणाची (रिअल-टाइम) गुप्तचर माहिती प्रदान करणारे नवीन उपग्रह प्रक्षेपित केले. खेरीज या वर्षी भारताने आपल्या अँटी-सॅटेलाइट क्षमताही प्रगत केल्या.
एकीकडे ही सज्जता करत असताना दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये भारतीय सेना आणि निमलष्करी दलांनी यंदा बरीच यशस्वी ऑपरेशन्स राबवली. या अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई अधिक कडक करण्यात आली. परिणामस्वरुप, सरत्या वर्षात खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर यंदा सीमापार घुसखोरी रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि स्मार्ट कुंपणांचा वापरही करण्यात आला. भारतीय संरक्षण क्षेत्रात 2024 मध्ये मानव संसाधन विकासालाही प्राधान्य देण्यात आले. त्याअंतर्गत नवीन भरती धोरण, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे सैनिकांची कौशल्ये अधिक उंचावत असल्याचे स्पष्ट होत आहे. महिलांच्या सहभागालाही प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे सशस्त्र दलांमध्ये त्यांची समावेशकता वाढली आहे. सरत्या वर्षात भारतीय संरक्षण क्षेत्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (॒कृत्रिम बुद्धिमत्ता), मशीन लर्निंग आणि ड्रोन तंत्रज्ञान यांचाही मोठ्या प्रमाणावर अवलंब केलेला दिसला. येत्या काळात हे तंत्रज्ञान युद्ध क्षेत्रात निर्णायक भूमिका बजावू शकते तसेच गुप्तचर आणि सर्वेक्षण क्षमतांमध्येही सुधारणा घडवून आणू शकते.
या पार्श्वभूमीवर येणारे वर्ष आणि आगामी काळ भारतीय संरक्षण क्षेत्राचा नवा चेहरा दाखवणारा ठरेल, यात शंका नाही. नजिकच्या भविष्यात भारताच्या संरक्षण क्षेत्रात काही महत्त्वाची उपकरणे आणि साधने पहायला मिळणार असून सशस्त्र दलांची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. यात नवीन पिढीचे लढाऊ विमान असणाऱ्या तेजस एमके-2 चा समावेश असेल. भारतीय स्वदेशी लढाऊ विमान ‘तेजस’ची ही सुधारित आवृत्ती लवकरच तयार होणार असून त्यामध्ये उच्च क्षमतेचे इंजिन आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स समाविष्ट आहे. त्याचबरोबर ‘एमसी’ (ॲडव्हान्स मेडियम कॉम्बेट एअरक्राफ्ट) हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमानही भारताच्या हवाई ताकदीत मोठी भर घालेल. खेरीज ड्रोन आणि मानवविरहित यंत्रणा सक्षम करणारे स्वार्म ड्रोन तंत्रज्ञानही संरक्षण व्यवस्था सशक्त करणार असून ही ड्रोन्स गटाने वा एकत्र काम करू शकतात. लवकरच ती शत्रूच्या पृष्ठभागावरील संरचना कवा हवाई लक्ष्य भेदण्यासाठी वापरली जातील.
याखेरीज गुप्तचर आणि युद्धभूमीवरील उपयोगासाठी अर्ध-स्वायत्त ड्रोन प्रणालीने युक्त आधुनिक ड्रोन्सही विकसित केले जात आहेत. स्वदेशी पाणबुड्या आणि जहाजांचा विचार केल्यास पी 751 प्रकल्पांतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आणि नवीन पिढीच्या पाणबुड्या लवकरच नौदलात समाविष्ट होणार असून आपली समुद्री ताकद वाढवतील. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘आयएनएस अरिहंत’ श्रेणीतील आण्विक पाणबुड्याही भारतीय नौदलाची सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. दरम्यान, यंदा भारताकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्रांबाबतही गांभीर्याने विचार झालेला दिसला. त्याअंतर्गत अग्नि (व्हीआय) या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलचा वापर लवकरच सुरू होऊ शकतो. त्याची रेंज दहा हजार किलोमीटरची असेल आणि ते आण्विक शस्त्रही वाहून नेऊ शकेल. दुसरे म्हणजे ‘शौर्य’ हे हायपरसॉनिक स्पीडने प्रवास करणारे क्षेपणास्त्रही शत्रूच्या सुरक्षा व्यवस्थेवर निर्णायक प्रभाव पाडण्यास सज्ज होत आहे.
नजिकच्या भविष्यकाळात भारत सायबर आणि अंतराळ तंत्रज्ञान आधारित शस्त्र प्रणालीवर भर देणार असून 2014 मध्ये याची सुरूवात झालीच आहे. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि डीआरडीओ एकत्रितपणे लष्करी उपग्रह प्रक्षेपणावर भर देताना दिसत आहेत. त्याचबरोबर सायबर हल्ल्यांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि देशाची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली लागू होत आहे. यालाही 2024 मध्ये प्रारंभ झाला आहे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा युद्धासाठी आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ॒कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणे तयार करण्यासाठी वापर केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे लवकरच उंच पर्वतीय भागात आणि धोकादायक परिस्थितीत तैनात होण्यासाठी स्वायत्त रोबो सैनिक तयार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा प्रकारे मॉडर्न रायफल्स आणि बंदुकांचा उपयोग करणे, नवीन श्रेणीतील स्नायपर रायफल्स आणि हलक्या वजनाच्या मशीनगन उपलब्ध करुन घेणे, रिअल-टाइम सॅटेलाईट डेटा मिळवण्यासाठी नवी उपग्रह प्रणाली तयार करणे, शत्रूच्या हालचाली ट्रॅक करण्यासाठी हाय-टेक सेन्सर आणि उपकरणांचा उपयोग करणे या सगळ्याला सुरूवात झाली असून लवकरच भारताची संरक्षण साधने अधिक प्रगत, स्वदेशी आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित बनतील, अशी अपेक्षा आहे. या आधुनिक साधनांच्या समावेशामुळे भारताची सुरक्षा यंत्रणा सक्षम होईल आणि देशाचे संरक्षण स्वावलंबी होईल. या दृष्टीने 2024 चे महत्त्व निर्विवाद राहील.
(अद्वैत फीचर्स)
