ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे काॅंक्वेस्ट २०२४ ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यामध्ये रंगणार आहे.
येत्या सोमवार, मंगळवारी ३० आणि ३१ डिसेंबर रोजी ठाणे शहरातील कोर्ट नाक्या जवळील सेंट्रल मैदानावर या स्पर्धा होणार आहेत.
राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे विविध संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते असे स्पर्धा समन्वयक आणि रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सांगितले. या स्पर्धेच्यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर आणि रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉ. निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
१००हून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहाने या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि खेळाचा आनंद लुटतात. रोख रक्कम आणि चषक या स्वरूपामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केले जाईल. तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारची बक्षीसेही देण्यात येणार आहेत असे क्लबच्या अध्यक्षा स्वाती येरी म्हणाल्या.
ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे, या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडले जातात. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची सोय रोटरीच्या वतीने करण्यात आली आहे. सामन्यांच्या दरम्यान वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या माजी अध्यक्ष माधवी डोळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *