मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२४-२५

जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा दुसऱ्या फेरीत दाखल

मुंबई : जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीच्या १४वर्षाखालील मुलांच्या गटात दुसरी फेरी गाठली. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या मुलांच्या सामन्यात जे.के. स्पोर्टस् ने मध्यांतरातील २१-२८ अशा पिछाडीवरून रामसेवक मंडळाचे कडवे आव्हान ४९-४७ असे परतवित आगेकूच केली. प्रथमेश शिंदे, मंगेश पासी यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाने ही किमया साधली. ध्रुव पिंपळे, आराध्य पाटील यांचा सुरवातीचा जोश मध्यांतरानंतर कमी पडला.
वीर नेताजीने चुरशीच्या लढतीत एफर्ड्स युनायटेडचा प्रतिकार ६०-५१ असा मोडून काढला. विश्रांतीला वीर नेताजी २७-२९असा २गुणांनी पिछाडीवर होता. प्रज्वल बनसोडे, पियूष शेलार यांनी चतुरस्त्र खेळ करीत एफरड्स ला विश्रांतीपर्यंत आघाडी मिळवून दिली होती. पण नंतर ते कमी पडले. रुद्रा शिंदे, वृषभ मिसाळ यांनी विश्रांतीनंतर आपली गुणवत्ता सिद्ध करीत वीर नेताजीच्या विजय साजरा केला. यश क्रीडा ने शिवशक्तीला ४४-२५ असे पराभूत केले. पूर्वार्धात २५-०५ अशी आघाडी घेणाऱ्या यश संघाने उत्तरार्धात सावध खेळ करीत विजय मिळविला. उत्तरार्धात शिवशक्ती ने आपला खेळ उंचावत सामन्यातील चुरस वाढविली. पण संघाला विजयी करण्यास ते कमी पडले. आयुष खांबेकर, क्षितिज नाक्ती यश संघाकडून, तर अतिष पाटील शिवशक्ती कडून उत्तम खेळले.
अन्य सामन्यांचा निकाल संक्षिप्त :- १)गोलफादेवी वि. वि. ओम् त्रिशूल (६०-३१), २)न्यू परशुराम वि. वि. जय दत्तगुरु(४८-२१), ३) रण झुंजार वि. वि. कस्तुरबा गांधीनगर(५२-२७), ४)विजय बजरंग व्यायाम शाळा वि. वि.वीर नेताजी(६१-४५), ५)समर्थ स्पोर्टस् वि. वि. श्रीमंत योगी(४०-२१). सर्व सामने १४वर्षाखालील मुलांचे पहिल्या फेरीचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *