-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ठाणेकरांना आश्वासन
मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही गृहनिर्माण संस्थांची स्वयंपुनर्विकास मोहीम सुरु करा
भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन
राजेंद्र साळसकर
ठाणे : दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि. आणि सहकार विभाग ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पहिले महा अधिवेशन पार पडले. या महा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी फोनवरून संवाद साधत ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी, जे काही निर्णय घेणार आहात त्याची सोडवणूक करण्यासाठी माझ्या दालनात निश्चितपणे बैठक बोलवीण, असे आश्वासन दिले. तर मुंबईत स्वयंपुनर्विकास ज्याप्रमाणे होतो तशा प्रकारची गृहनिर्माण संस्थांची स्वयंपुनर्विकासाची मोहीम ठाणे जिल्ह्यातही सुरु झाली पाहिजे, असे आवाहन भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे देशभर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी आ. दरेकर यांच्या फोनवरून संवाद साधला. या महा अधिवेशनाला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, ठाण्याचे आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे, महपरिषदेचे आयोजक व ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, कोकण सहकार विभागाचे सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पुणे सुहास पटवर्धन, विकास पाटील यांसह हौसिंग सेक्टरमधील पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इच्छा असूनही या ठिकाणी येऊ शकले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावतीने मी आश्वस्त करतो की, येणाऱ्या १०-१५ दिवसांत हौसिंगच्या विषयाबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंत्रालयात घेऊ आणि जे विषय शासनाशी संबंधित आहेत ते मार्गी लावू.
पुढे बोलताना आ. दरेकर म्हणाले की, मुंबईतील गोरेगाव येथे हौसिंग फेडरेशनच्यावतीने व मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने अधिवेशन झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या हौसिंग सेक्टरमधील १८ मागण्यांचे नियोजन आम्ही मुख्यमंत्री यांना दिले. त्यापैकी १६ मागण्यांचे जीआर काढण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि चांगले क्रांतिकारी निर्णय हौसिंग सेक्टरसाठी घेतले. म्हणून अशा परिषदांची गरज असते. अशा अधिवेशनांच्या माध्यमातून हौसिंगचे जे छोटेमोठे प्रश्न, धोरणात्मक विषय आहेत. त्यांना वाचा फुटत असते. मग हे ठराव घेऊन शासनाकडे जाऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. सीताराम राणे आणि सर्व आयोजकांनी यशस्वी असे अधिवेशन ठाणे नगरीत पार पाडले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
तसेच हौसिंग सेक्टरमध्ये अनेक विषय आहेत. या सर्व प्रश्नांची यादी करा. ते सर्व प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसवून सोडविण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करून घेऊ, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला. ठाण्यातील हौसिंग सोसायटी, पुणे-नाशिक हौसिंग फेडरेशन यांच्याकडून अपेक्षा आहे की, मुंबईत सेल्फ डेव्हलपमेंट ज्याप्रमाणे होते तशा प्रकारची गृहनिर्माण संस्थांची स्वयंपुनर्विकासाची मोहीम ठाणे जिल्ह्यातही सुरु झाली पाहिजे. यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. ठाणे जिल्हा बँकेलाही कर्जपुरवठा करायला लावू. राज्य सहकारी बँकेला पैसे लागल्यास द्यायला लावू. आणखी पैशाची आवश्यकता लागली तर मी मुख्यमंत्री यांच्याशी बोललोय स्वयं पुनर्विकास हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन काढा आणि या संस्थांना नाममात्र व्याज दरात कर्ज उपलब्ध करून द्या. ही चळवळ, फेडरेशन, संघटना कशासाठी आहे? जेव्हा या योजनेतून ठाण्यात एखादी इमारत उभी राहील त्यावेळी शेकडो लोकं आपल्या मागे येतील आणि ती चळवळ मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यात पसरावी, अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली.
दरेकर पुढे म्हणाले की, मुंबईत स्वयं पुनर्विकास संकल्पना यशस्वी केली. मुंबई जिल्हा बँकेकडे गृहनिर्माण संस्थांचे कर्जासाठी सोळाशे प्रस्ताव आलेत. आम्ही ३६ संस्थांना कर्जपुरवठा केला. मुंबईतील १२ हौसिंग सोसायट्यांनी स्वतःच्या इमारती स्वतः उभ्या केल्या. चारशे ते साडेचारशे स्क्वे.फूट जागा द्यायला विकासक कुचराई करत होता तिथे स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून ८००-८५० स्क्वे फुटाच्या घरात तेथील माध्यमवर्गीय मराठी माणूस राहायला गेला असल्याचेही दरेकरांनी म्हटले. तसेच मुंबईला हौसिंगची परिषद घेतली. प्रकाश दरेकर आणि मुंबई बँकेने पुढाकार घेतला. मुंबईत हौसिंग सेक्टरमध्ये अमूलाग्र बदल केला. आज मुंबईत मोठ्या प्रमाणावर क्रांती होताना दिसतेय. त्या क्रांतीची ठिणगी ठाणे, नाशिक, पुणे येथे पडली पाहिजे,असेही दरेकर म्हणाले.
00000
