ठाणे :घसरगुंडी झाल्यावर तळाच्या फलंदाजांनी किल्ला लढवत सामना अनिर्णित राखत गणपत भुवड संघाला ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. गणपत पाटील एकादश संघाला २४६ धावांवर रोखल्यानंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या गणपत भुवड संघाच्या तळाच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मारा खेळून काढताना पहिल्या डावात ९ बाद १९५ धावा करत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
यश म्हात्रे आणि अन्वय जोशीने अर्धशतके झळकावत गणपत पाटील संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. यशने ८९ आणि अन्वयने ६६ धावांचे योगदान दिले. त्यापाठोपाठ वेद मोरेने ३५ आणि युग पाटीलने २८ धावांची संघाच्या धावसंख्येत भर टाकली. या डावात आदित्य कौलगीने चार आणि तन्मय नगरकरने तीन फलंदाज बाद केले.
त्यानंतर तन्मय मालुसरेने ८४ धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने गणपत भुवड संघ ९ बाद १५५ असा अडचणीत सापडला होता. पण अमन सिंगने नाबाद २४ धावा करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर उभे राहत सामना अनिर्णित राखला. युग पाटील आणि हर्ष नाडकरने प्रत्येकी तीन आणि दिक्षांत पाटीलने दोन बळी मिळवत संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
संक्षिप्त धावफलक : गणपत पाटील एकादश संघ : (पहिला डाव) : ८२ षटकात सर्वबाद २४६ ( यश म्हात्रे ८९, अन्वय जोशी ६६, वेद मोरे ३५,युग पाटील २८, तन्मय नगरकर ९-३-१६-३, आदित्य कौलगी २१- ५-६०- ४) विरुद्ध गणपत भुवड एकादश संघ 🙁 पहिला डाव ): ८२ षटकात ९ बाद १९५ ( तन्मय मालुसरे ८४,अमन सिंग नाबाद २१,युग पाटील १८-२-७३-३, हर्ष नाडकर २१-७-४२-३, दिक्षांत पाटील २१-९-३१-२) सामना अनिर्णित. सरस गुणांच्या आधारामुळे गणपत भुवड संघ अंतिम फेरीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *