विविध स्पर्धांमध्ये वरिष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग
मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेत पार्ले महोत्सव २०२४ च्या होम मिनिस्टर पैठणीच्या मानकरी ठरल्या शीला वावळे तर उपविजेत्या ठरल्या लक्ष्मी शिरसाट आणि वर्षा अवघडे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला होता. त्यांना साथ देण्यासाठी विलेपार्ले येथील दुभाषी मैदान संपूर्ण महिला वर्गानी भरून गेले होते. महोत्सवाच्या सह आयोजिका आणि माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांनीही उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहित केले. याचवेळी वरिष्ठ नागरिकांच्याही विविध स्पर्धांमध्ये रामचंद्र प्रभुदेसाई, प्रमोद शेंडे, जयंत गुजर, हिराबाई जाधव, आशा परब, संजीवनी कुळकर्णी, विलासिनी चित्रे, चंद्रकांत साळवी, गोपाळ उदेशी अशा स्पर्धकांनी बाजी मारली. वरिष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती दाखवली होती.
महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता असून त्यांच्यासाठी पार्ले महोत्सव हे अत्यंत महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यांनी पुढे येऊन आपले कौशल्य दाखवले पाहिजे तसेच इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे विचार ज्योती अळवणी यांनी यावेळी स्पर्धेचे उद्घाटन करताना सांगितले.
गेल्या ९ दिवसांपासून हा महोत्सव विलेपार्ले येथे होत असून यात मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातील स्पर्धक वेगवेगळ्या वर्गवारीत सहभागी आहे. कला-क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांची रेलचेल सुरु असून पारितोषिकांचीही लयलूट या स्पर्धकांकडून होत आहे. या महोत्सवाची व्याप्ती वाढली असून येणाऱ्या आगामी वर्षात रौप्यमहोत्सव साजरा करताना तो अधिक व्यापकतेने केला जाईल, असे महोत्सवाचे आयोजक आमदार पराग अळवणी यांनी सांगितले. त्यांच्या हस्तेदेखील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. पोलिस खात्यातील महिला अधिकारीदेखील या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्या हस्तेही विजेत्यांना पारितोषिके दिली गेली.
उद्या या महोत्सवाचा शेवटचा दिवस असून मान्यवरांच्या उपस्थितीत गत वर्षाला निरोप देत आणि नव वर्षाचे स्वागत करत त्याची सांगता होणार आहे. आगामी वर्षे महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने अनेक योजना असून त्याचे नियोजन करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.