मुंबई : दीपाली चाळके हिच्या या संकल्पनेवर वारली चित्रावली हा अभिनव कार्यक्रम, विश्व भरारी फाउंडेशन आणि विलेपार्ले येथील ख्यातनाम चित्रकार चित्रा वैद्य आणि चंद्रशेखर नाईक, तसेच त्यांचे सहकारी यांच्या मदतीने विलेपार्ले पूर्व येथील शिवाजी विद्यालयात आयोजित करण्यात आला. विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या वारली चित्रकला या कलेचे पुनरुज्जीवन करण्याकरिता, पार्ल्यातील प्रतिथयश चित्रकारांची मदत घेऊन, वारली चित्रावली हा कार्यक्रम राबविला.
विश्व भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा लता गुठे व सचिव प्रकाश राणे यांनी, या कार्यक्रमास सहकार्य तर केलेच, परंतु या पद्धतीचे अनेक कार्यक्रम येऊ घालण्याची योजना देखिल आखली. या दोघांनी, आपल्या छोटेखानी भाषणात, या संदर्भात आणखीन नवे काय करता येईल, याची योजना आखत, दिपाली आणि पार्ल्यातील चित्रकारांचे खूप कौतुक केले. तसेच विश्व भरारी फाउंडेशन तर्फे अनेक कार्यकर्ते आणि सभासदांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन अभिनंदन केले गेले. भारत विकास परिषद, पदाधिकारी दिगंबर काळे यांनी भारत विकास परिषद आणि केशव सृष्टी यांच्यातर्फे होणाऱ्या समाजसेवेचे विवेचन आणि निवेदन करीत, दोन्ही संस्थांची प्रतिमा उंचावण्यास मदत केली. प्रकाश राणे यांनी, आपली संस्था देखील असल्या सामाजिक कार्यामध्ये सहकार्य देण्यास, सतत तत्पर राहील असे आश्वासन दिले. आसन योग संस्थेचे विविध वयोगटातील विद्यार्थी सरसावून पुढे आले आणि त्यानी कुंचले फिरवीत, चित्रकार मंडळींना सहकार्य केले. स्वाती पोळ यांनी सुरेल आवाजात सरस्वती वंदना म्हटली. चारुशीला काळे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत, हलकेफुलके निवेदन करून सर्वांची मने जिंकली.