रविवारी 108 नशेखोरांवर आणि 92 मोटारसायकलस्वारांवर कारवाई
कल्याण : अल्पवयीन मुलीची हत्या आणि इतर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतूल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आणल्याचे दिसत आहे. कल्याणच्या विविध भागांमधील नशेखोरांना ताब्यात घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी चांगलाच इंगा दाखवला. पोलीसी खाक्या दाखवण्यासह अनेक नशेखोरांना उठाबशा काढायला लावल्या आणि पोलीसांनी त्यांची वरातही काढल्याचे दिसून आले. पोलीस उपायुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा प्रकारची कारवाई सतत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून रविवारी रात्री या ठिकाणी एकुण 108 नशेखोरांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच रोडवरील अती वेगाने मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा एकूण 92 कारवाई कल्याणमध्ये पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पोलिसांची धडक कारवाई मोहिम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाई सत्रामुळे नशेखोरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.