भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

राजेद्र साळसकर
मुंबई- वैकुंठवासी प.पू. सदगुरु मोरे माऊली महाराजांनी आपल्या समोर अनेक चांगले आदर्श ठेवले आहेत. आता त्यांचाच वारसा तंतोतंत पुढे नेण्याचे काम दादा महाराज मोरे माऊली करताहेत. आपला हा उत्कर्षांचा ठेवा अशाचप्रकारे आपण पुढे नेऊया. समाजासाठी जे काही चांगले देता येईल ते देण्याचा प्रयत्न करूया. हिंदुत्वाचा, साधूसंतांचा विचार पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानाची, प्रबोधनाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे.
लोअर परेल येथील श्रीसंत मोरे माऊली विठ्ठल मंदिर येथे वैकुंठवासी प. पू. मोरे माऊली महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सदगुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तन सोहळ्याला भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनीही उपस्थिती दर्शवली. यावेळी दरेकर कीर्तनात तल्लीन झालेले दिसून आले. यावेळी उपस्थित वारकरी वर्गाशी संवाद साधताना आ. दरेकर म्हणाले की, मोरे माऊली महाराजांचे  कीर्तन ऐकायची मला संधी मिळाली नाही परंतु त्यांनी वारकरी सांप्रदायात जो काही अनमोल असा ठेवा ठेवलाय त्याची मला निश्चित प्रचिती आहे. कधी मुंबईच्या वारकरी मंडळाचे नेतृत्व केले. पंढरपूरचा पांडुरंग बडव्यांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी जे अभियान चालवले ते यशस्वी केले. असे अनेक चांगले आदर्श आपल्यासमोर मोरे माऊली महाराजांनी ठेवले. आता त्यांचाच वारसा तंतोतंत पुढे नेण्याचे काम दादा महाराज करताहेत.
दादा महाराज यांच्याविषयीही वेगळी अशी अपार श्रद्धा आहे. त्यांचा विचार, सध्याच्या परिस्थितीत तरुण पिढीला, आपल्या सर्वांना मार्गदर्शन असते. आपण आपल्या संसारिक, पारिवारिक जीवनात पैसा, संपत्ती, वैभव मिळवतो. परंतु सुख, शांती, समाधान हे परमेश्वराच्या चरणी असते आणि म्हणूनच आपल्याला असे विचार हवे असतात. या वातावरणात आले की ,आमच्यासारख्या कार्यकर्त्यालाही राजकारणात, समाजकारणात काम करण्याची स्फूर्ती मिळते. जिथे- जिथे दादा महाराजांचे विचार ऐकता येतील, दर्शन घेता येईल यासाठी माझा प्रयत्न असतो. आपला हा उत्कर्षांचा ठेवा अशाचप्रकारे आपण पुढे नेऊया. समाजासाठी जे काही चांगले देता येईल ते देण्याचा प्रयत्न करूया. हिंदुत्वाचा, साधूसंतांचा विचार पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानाची, प्रबोधनाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *