मुंबई : कला-क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळीचा भाग ठरलेल्या आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली पार्ले महोत्सव २०२४ ची सांगता झाली असून गत वर्षाला निरोप देत आता नव्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षात हा महोत्सव साजरा होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आमदार पराग अळवणी आणि माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या हस्ते अंतिम स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पार्ले महोत्सवमय झाले होते. या महोत्सवात यंदा ६० हजारांहून अधिक खेळाडू आणि स्पर्धकांनी वेगवेगळ्या गटात भाग घेतला. त्याचबरोबर एकूण ३५०० जणांना पारितोषिके प्राप्त झाली. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले तर समारोपाच्या आदल्या दिवशी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उपस्थिती दाखवली. महोत्सवात पहिल्यांदाच दहीहंडी या साहसी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे, पालिका आयुक्त भूषण गगरानी, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य तसेच अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेटी दिल्या.
आगामी २०२५ हे वर्ष पार्ले महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे आतापासूनच कार्यकर्ते त्याचे नियोजन करून हा महोत्सव भव्यदिव्य करण्यावर भर देतील, या महोत्सवाची व्याप्ती अधिक वाढेल तसेच अधिक स्पर्धक, नवे खेळ यात समाविष्ट होईल, असे आयोजक आमदार पराग अळवणी यांनी याबाबत बोलताना सांगितले.
