गेल्या तीन-चार दिवसांपासून अफगाणिस्तानी तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमकी होत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही देश भारताचा संदर्भ देऊन भारतासारखा सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगत आहेत. दोन्ही देशांच्या चकमकीत आतापर्यंत किमान शंभराहून अधिक जण ठार झाले आहेत. अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा बदला घेतला आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानला विभाजित करणारी ड्युरंड रेषा ओलांडून तालिबानी सैन्याने मोठा हल्ला केला. अफगाण तालिबान सैन्याने शेजारील पाकिस्तानमधील अनेक चौक्यांना लक्ष्य केले आहे. तालिबान आता पाकिस्तानी भूभाग काबीज करण्याच्या तयारीत आहे, असे अफगाणिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने सांगितल्याने पाकिस्तानमधील तणाव वाढणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात पाकिस्तानचे नाव घेतलेले नाही, तर त्याला ‘काल्पनिक रेषा’ ओलांडलेल्या भागावर हल्ला म्हटले आहे. अफगाणिस्तानचे सरकार ड्युरंड रेषेला दोन देशांमधील विभाजन रेषा मानत नाही. तिला काल्पनिक रेषा म्हणतात. तालिबान पाकिस्तानमधील भागाला अफगाणिस्तानचा भाग मानतात. सीमारेषेवरून दोघांमध्ये अनेक संघर्ष झाले आहेत. तालिबानने पाकिस्तानचा भूभाग स्वीकारला नाही. अफगाण संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की देशाच्या दक्षिण-पूर्व दिशेकडून प्रत्युत्तर म्हणून काल्पनिक रेषा ओलांडून अनेक बिंदूंना लक्ष्य केले गेले. हे विधान पाकिस्तानबद्दल आहे का, असे विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावरज्मी म्हणाले, की आम्ही याला पाकिस्तानचा भूभाग मानत नाही. अफगाणिस्तान अनेक दशकांपासून ड्युरंड लाइन स्वीकारण्यास नकार देत आहे. ही रेषा १९व्या शतकात ब्रिटनच्या राजवटीत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील पर्वतीय आणि आदिवासी प्रदेशातून रेखाटण्यात आली होती. अफगाणिस्तानातून येत असलेल्या मीडिया रिपोर्टस्नुसार तालिबानी सैन्याच्या हल्ल्यात १९ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. अफगाणिस्तानच्या ‘टोलो न्यूज’ने संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की तालिबान सैन्याने हा हल्ला खोस्त आणि पक्तिका प्रांतांना लागून असलेल्या पाकिस्तानी भागात केला आहे. यापूर्वी पाक हवाई दलाने पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यात हवाई हल्ला केला होता. त्यात ५० हून अधिक लोक मारले गेले होते. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुले होती. तालिबानने याला भ्याड कृत्य म्हणत पाकिस्तानकडून बदला घेण्याची शपथ घेतली होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव अभूतपूर्व पातळीवर वाढला आहे. दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध झाले, तर त्याचा परिणाम संपूर्ण प्रदेश आणि युरेशियावर होऊ शकतो. येथे भारताचे अनेक हितसंबंध आहेत. या युद्धाचा लाखो लोकांवर परिणाम होईल आणि प्रदेशात अस्थिरता वाढेल. युद्धाचा दहशतवादावरही परिणाम होऊ शकतो.
दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे; मात्र अलीकडच्या काळात सीमेवर हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर भारत आणि तालिबान यांच्यात चर्चा वाढली आहे. आपल्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जाणार नाही, असे आश्वासन तालिबान सरकारने भारताला दिले आहे. पाकिस्तानने पूर्व अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले दहशतवाद्यांच्या विरोधात असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे, तर तालिबानच्या म्हणण्यानुसार पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यात चार ठिकाणी पाकिस्तानने हल्ले केले. मारले गेलेले निर्वासित होते. पक्तिकातील हल्ल्याच्या काही दिवसांनंतर, अफगाण तालिबान सैन्याने अप्पर कुर्रम जिल्ह्यातील अनेक पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ले केले असून एका पाकिस्तानी निमलष्करीला ठार केले. तसेच आत्मघातकी बॉम्बस्फोट, हवाई हल्ले किंवा रस्त्यावरील मारामारीच्या घटना ड्युरंड रेषेवर होताना दिसत आहेत. ड्युरँड ही रेषा १८९६ मध्ये एका कराराद्वारे मान्य करण्यात आली. ही रेषा पश्तून आदिवासी भागातून आणि दक्षिणेकडील बलुचिस्तानमधून जाते. अशा प्रकारे, ही रेषा पश्तून आणि बलूच दोन देशांमध्ये विभागते. भू-राजनीती आणि भू-रणनीतीच्या दृष्टिकोनातून ड्युरंड रेषा ही जगातील सर्वात धोकादायक सीमा मानली जाते.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान प्रादेशिक आर्थिक एकात्मतेसाठी व्यवहार्य मार्ग देतात, जे मध्य आशिया आणि दक्षिण आशियाला जोडू शकतात. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढता तणाव हे या क्षेत्रासाठी मोठे आव्हान आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांना तातडीने पावले उचलावी लागतील. सीमावादावर शांततापूर्ण तोडगा काढावा लागेल. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांना एकत्र काम करावे लागेल. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी नेत्यांनी दीर्घकालीन समस्या सोडवण्याचे धाडस दाखवणे आवश्यक आहे. अफगाण तालिबानचे सैनिक ड्युरंड रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसले असून ते पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करत आहेत. चौक्यांवर गोळीबार केला जात आहे. अशा परिस्थितीत ही ड्युरंड बॉर्डर काय आहे आणि त्याबाबत दोन्ही देशांमध्ये वाद का आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते खोवरजामी यांनी ड्युरंड रेषेबाबत म्हटले आहे, की आम्ही याला पाकिस्तानी भूभाग मानत नाही. याला अफगाणिस्तान ‘हायपोथेटिकल लाइन’ असेही म्हणतात, जी १९४७ पासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा आहे. तथापि, अफगाणिस्तानने कधीही अधिकृतपणे ड्युरंड रेषेला मान्यता दिली नाही.
अफगाण आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी ड्युरंड रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसून एकमेकांवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ला केला. तालिबानी सैनिक पाकिस्तान सीमेकडे सरकत आहेत, युद्ध कधीही सुरू होऊ शकते. आता त्यात रशियाने उडी घेतली असल्याने अमेरिकाही मागे राहण्याची शक्यता नाही. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तणाव वाढला आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २६४० किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव ड्युरंड लाइन आहे. ही रेषा पश्तून आदिवासी भागातून आणि दक्षिणेकडील बलुचिस्तानमधून जाते. इंग्रजांनी दक्षिण आशियात आपले हित जपण्यासाठी ड्युरंड रेषा निर्माण केली होती. त्या वेळचे भारताचे परराष्ट्र सचिव सर हेन्री ड्युरंड यांच्या नावावरून या सीमेला हे नाव देण्यात आले आहे. तत्कालीन अफगाण शासक अब्दुर रहमान यांच्या सहकार्याने ब्रिटिशांनी ती काढली होती. ब्रिटनने आपले हित साधण्यासाठी अफगाणिस्तानची सत्ता रहमानकडे सोपवली होती.
या रेषेचा मोठा भाग पाकिस्तानमधून जातो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी ही रेषा त्यावेळी आखण्यात आली होती. त्या वेळी पाकिस्तानचाही भारतात समावेश होता. त्या वेळी रशियाचे विस्तारवादी धोरण टाळण्यासाठी ब्रिटिश साम्राज्याने अफगाणिस्तानचा ‘बफर झोन’ म्हणून वापर केला होता. ही रेषा काढताना स्थानिक जमाती आणि भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे विचारात न घेतल्याने ती वादात सापडली आहे. दोन प्रमुख आदिवासी गट ड्युरंड रेषेजवळ राहतात. हे गट पंजाबी आणि पश्तून आहेत. बहुतेक पंजाबी आणि पश्तून हे सुन्नी मुस्लिम आहेत. पंजाबी हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा वांशिक गट आहे, तर पश्तून अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा आदिवासी गट आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेजवळ राहणाऱ्या पश्तूनांचा आरोप आहे, की या सीमेमुळे त्यांच्या घरांमध्ये फूट पडली आहे. नियोजनाचा भाग म्हणून, ब्रिटिश सरकारने पश्तूनबहुल भागांमध्ये एक रेषा आखली. त्यामुळे पश्तून दोन देशांमध्ये विभागले गेले. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून ड्युरंड रेषेवर तणाव वाढला आहे. तालिबान या रेषेला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश आपापल्या सीमेवर दावा करतात. येथूनच तालिबान समर्थित दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये हल्ले करत राहतात. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सत्तेवर परत आल्यापासून, पाकिस्तानने काबूलमध्ये मैत्रीपूर्ण सरकारची अपेक्षा केली होती, जी ड्युरंड रेषा ओळखेल. अफगाण आणि तालिबानची लष्करी ताकद किती आहे? तालिबानकडे ८० हजार सैनिक आहेत आणि अफगाण सैन्यात ५ ते ६ लाख सैनिक आहेत. याशिवाय अफगाणिस्तानकडे हवाई दल आहे. तथापि, या दाव्यानंतरही, तालिबान जमिनीवर मजबूत असल्याचे सिद्ध करणारे अनेक तथ्य आहेत. तालिबानचे मनुष्यबळ स्त्रोत आदिवासी भागात स्थायिक झालेल्या जमाती आणि त्यांचे लढवय्ये आहेत. याशिवाय कट्टरतावादी धार्मिक संस्था आणि मदरसेही त्यांच्या कल्पनेला पाठिंबा देत आहेत.
