अनिल ठाणेकर
ठाणे : ‘गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेंड वाल्मिक कराड हा सरेंडर करणार होता हे मी अगोदरच सांगितले होते. यापूर्वीच मी ट्विट केले आहे,’ सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड पुणे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर केला आहे.
संतोष देशमुख हे भाजपचे होते आमच्या पक्षाचे नव्हते, पण माणुसकी जिवंत राहावी यासाठी आम्ही लढतो आहोत.संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. माझी फडणवीसांना विनंती आहे की, मागच्या दोन-तीन वर्षात झालेल्या हत्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याही कुटुंबियांना बोलवून घ्यावं. त्यावेळी कळेल की कोणी कोणाची जमीन बळकावली आणि कोणी कोणाची हत्या केली.” असाही घणाघात आव्हाड यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेला जोपर्यंत वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जनतेने शांत बसू नये असं आवाहनही यावेळी केलं. आव्हाड यांनी आणखी एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, एक हत्या तर भयंकर आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे, पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरून मुलीला सांगितलं की एक तर तू गोळी मारून घे नाही तर याला गोळी मारून घ्यायला सांग. याचा संपूर्ण तपशील त्यांनी यावेळी दिला नाही.
धनंजय मुंडे यांच्याबाबतीत गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “नैतिकदृष्ट्या मी समाजतील, राजकारणातील घडामोडी वाचत असतो, लक्षात ठेवत असतो. त्यावरुन राजकारणात आत्तापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्याही मंत्र्यावर झाले नाहीत.
०००००