कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दीपोत्सव साजरा
शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्या वर्षीही आयोजन राज भंडारी पनवेल : पनवेल शहरातील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात दिव्यांची रांगोळी साकारून त्यावर त्या त्या आकाराचे मातीचे दिवे ठेवत तब्बल ४१ हजारांहून अधिक दिव्यांच्या रोषणाईमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसमवेत दीपोत्सव साजरा केला. सर्वप्रथम शाळेतील विद्येची देवता सरस्वती देवी आणि शिक्षण महर्षी तथा संस्थेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेसमोर शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्याहस्ते पूजन करून शाळेच्या मैदानात साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही दीपोत्सव साजरा करण्यात आला. गतवर्षी ११ हजार दिव्यांच्या रोषणाइमध्ये हा दीपोत्सव पार पडला होता. यावर्षी देखील अशाच पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रत्येक मुलांना केवळ ५ मातीच्या पणत्यांच्या दिव्यांचे योगदान देण्याचे आवाहन केले, आणि मुलांनी या दीपोत्सवासाठी उत्साह दाखवीत तब्बल ४१ हजार दिवे शाळेत जमा केले. यामध्ये संस्थेच्या वतीने ५०० लिटर तेल दीपोत्सवासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा असा दीपोत्सव साजरा केला. सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील शाळेत तब्बल ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अत्यंत कमी शुल्क आकारून शिक्षण विद्या देणाऱ्या या शाळेत ४ भाषांच्या शाळा सुरू आहेत. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची संख्या देखील जवळपास ३५० इतकी आहे. गोरगरिबांच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची प्रतिभा डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब लिमये यांनी या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. ती आजही शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे जपत आहेत. यावेळी उपमुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक श्रीम. पूनम कांबळे, श्रीम. अनिता पाटील, बाबुराव शिंदे, धर्मेंद्र दीक्षित, प्राथमिक विभाग प्रमुख श्री. पाटील, ज्यू. कॉलेज उपमुख्याध्यापक, संजय पाटील, अण्णासाहेब झिटे, कार्यालय प्रमुख बिना कडू, प्रसाद सहस्त्रबुद्धे, माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख सौ. कुलकर्णी, मराठी प्राथमिक विभागाचे मोकल आदींसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000