ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकांच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर,परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येत आहेत. त्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उप नगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये, यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत तात्परुती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले. तसेच, या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी सांगितले. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान, आयुक्त राव यांनी आतापर्यंत झालेले काम, पोहोच मार्गाचे काम, पूल आदी कामांचा आढावा घेतला. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाविषयी माहिती…