Month: December 2024

 रक्तदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 महावितरणचा उपक्रम; १०२ बाटल्या रक्त संकलन   कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महावितरणच्या उल्हासनगर एक, दोन व बदलापूर विभागाकडून आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवताना १०२ अधिकारी, अभियंते व जनमित्रांनी रक्तदान करत महामानवाला अभिवादन केले. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे तसेच कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अंबरनाथ तहसिल कार्यालयाशेजारील महावितरणच्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागीय कार्यालयात रक्तदान आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने, उल्हासनगर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्यासह १०२ अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उल्हासनगर एक आणि दोन तसेच बदलापूर विभाग कार्यालय, विविध कामगार संघटना प्रतिनिधी, अभियंते, जनमित्र यांच्या पुढाकारातून आणि साई सिटी हॉस्पिटल तसेच अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात आले. 00000

 शिवकन्या मंडळाची उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मुंबई : जय शंकर चौकने द्वितीय श्रेणीत, तर शिवकन्या मंडळाने कुमारी गटात मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पूर्व विभागात उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.मुंबई उपनगर कबड्डी असो.ने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जय शंकरने अश्वमेध प्रतिष्ठानचा दुबळा प्रतिकार ३४-१२ असा परतवून लावला. पहिल्या डावात १४-०८ अशी आघाडी घेणाऱ्या जय शंकरने दुसऱ्या डावात आणखी जोषपूर्ण खेळ करीत २४ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. सचिन जाधव, रोहित आरोटे या विजयाचे शिल्पकार ठरले. अश्वमेधच्या ओंकार मोरेची लढत दुसऱ्या डावात दुबळी ठरली. शिवकन्या मंडळाने कुमारी गटात चेंबूर क्रीडा केंद्राला २४-१५ असे नमवित या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पूर्वार्धात ०९-११अशा पिछाडीवर पडलेल्या शिवकन्याने उत्तरार्धात आक्रमक खेळ करीत ९ गुणांनी सामना आपल्या बाजूने झुकविला. परी कोरी, मेहजबीन शेख यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. चेंबूरच्या देवयानी नवले, गुंजन सुवर्णा यांच्या प्रतिकार उत्तरार्धात कमी पडला. महिला गटात वंदे मातरम् ने आकाश स्पोर्टस् चा २२-०८ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली. प्रसिता पन्हाळकर, रिया निंबाळकर यांच्या झंझावाती खेळाने हा विजय सोपा केला. आकाशाची तनिष्का बद्रिके चमकली. प्रथम श्रेणी पुरुषात शितलादेवी संघाने गुरुकृपा संघावर २५-१४ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. पुरुष द्वितीय श्रेणी गटात शिवरदेवने शिव मराठाचा १७-१५ असा, तर संघर्षाने के.आर. टी. चा २०-०९ असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. ००००

 आज रंगणार ६४ खेळाडूंमध्ये चुरस

 कामगार महर्षी आंबेकर स्मृती बुध्दिबळ स्पर्धा   मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा.पासून परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात रंगणार आहे. ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटामधील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ६४ खेळाडूंमध्ये पहिल्या सत्रात चुरशीच्या साखळी लढती होतील. संघाचे अध्यक्ष व आमदार सचिनभाऊ अहिर आणि  सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संस्थापक स्व. गं.द. आंबेकर यांना अभिवादन करून स्मृती सप्ताहामधील बुध्दिबळ स्पर्धेच्या प्रथम उपक्रमास प्रारंभ होईल. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेत विजेतेपदाच्या दावेदारीसाठी अधवान ओसवाल, जॉब थॉमस मॅक्सलीन, समीरा थोरात, सक्षम म्हामूण, ध्रुव जैन, मिलन वेद, प्रणव चव्हाण, शान्वी अग्रवाल, सस्मित भूरावणे, अथर्व लखोटिया, स्वरा मोरे, धीर सोनावाला, समर्थ साळगावकर, राज गायकवाड, यश चुरी, सान्वी सिन्हा, गीतेश चव्हाण, थिया वागळे, वारुनिका मेहता, क्षितीज नाईक, सुजय सावंत, स्टीव्हन शिंदे आदी सबज्युनियर बुध्दिबळपटू प्रतिस्पर्ध्यांना शह देणारे विजयी डावपेच रचण्याच्या जय्यत तयारीत आहेत. स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. स्विस लीग पध्दतीच्या स्पर्धेमधील प्रत्येक साखळी सामने १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटचे होणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, सुनील अहिर, राजन लाड, शिवाजी काळे, मिलिंद तांबे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच गिरणी कामगार महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचा दुसरा उपक्रम आंबेकर होमिओपथिक दवाखान्याच्या डॉ. रुपाली जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आरएमएमएस प्रांगणामध्ये होणार आहे. ०००००

 ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

 समतामूलक विचारांचा प्रचार – प्रसार करण्याची जबाबदारी आपलीच – आयुक्त सौरव राव   ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी य देशाला फक्त संविधानच दिले नाही. तर, सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारीत करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळेस ते बोलत होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी,  अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, बिरारे, गोदापुरे आदी उपस्थित होते. यावेळी सौरव राव यांनी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजाने चालावे, यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे, असे सांगितले. या प्रसंगी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरळीतील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांतर्फे ‘शैक्षणिक मार्गदर्शन मोहीम’

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यामध्ये स्त्री – पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ही…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत. जगाच्या इतिहासात अनेक विचारवंत, क्रांतिकारक होऊन गेले, परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इतिहासच बदलून नव्याने इतिहास लिहून आधुनिक भारताचा नकाशा जगासमोर आणणार्‍या प्रकांड पंडिताचा ६ डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन. शोषित-वंचितांच्या हक्क आणि अधिकारांसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. बाबसाहेबांच्या निधनाची वार्ता देशासह जगभरात वाऱ्यासारखी पसरली होती. ही वार्ता ऐकून देशातील प्रत्येक नागरिकांना हंबरडा फुटला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव मुंबईत आल्यानंतर मुंबईत प्रचंड गर्दी झाली. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला असंख्य लोकं जमली. अक्षरशः मुंबई थांबली होती. बाबासाहेबांच्या निधनामुळे मुंबईतील जवळपास दोन लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता. २५ कापड गिरण्या पूर्णपणे बंद, तर ५ गिरण्या अंशत: चालू होत्या. परळ, माटुंग्यातील रेल्वे वर्कशॉप संपूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या गोदीतील सुमारे २५ हजार कामगार आले होते, अशी आठवण डॉ.जितेंद्र आव्हाड करुन देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी फक्त आचार्य अत्रे यांचे भाषण झाले. आचार्य अत्रे या भाषणात म्हणतात,असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही’ आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मराणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत..? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली..? “महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही. परंतु असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही.“झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत..! भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हा तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. अशी शब्दुसमनांची आदरांजलीआमदारडॉ.जितेंद्रआव्हाडयांनी वाहिली आहे.

खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत

ठाणे : ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासानाने गेल्या काही महिन्यांपासून पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाडी किनारी भागातील…

 अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

 महेक पोकरची धुवाधार शतकी खेळी   ठाणे : सलामीला आलेल्या  महेक पोकरची कर्णधारपदाला साजेशी धडाकेबाज शतकी खेळी हे व्हिक्टरी क्रिकेट क्लबने स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबवर मिळवलेल्या मोठया विजयाचे वैशिष्ट्य ठरली. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत व्हिक्टरी क्रिकेट क्लबने २९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबला ९१ धांवात गुंडाळत मोठा विजय साजरा केला. सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात महेक आणि अलीना मुल्ला या सलामीच्या जोडीने दिडशतकी भागीदारी रचत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३० चौकार आणि एक षटकारासह १५५ चेंडूत १८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अलिना ६१ धावांवर बाद झाल्यावर ही भागिदारी संपुष्टात आली. अलिनानाने अर्धशतकी खेळीत ११चौकार आणि एक षटकार ठोकला. महेकने १०१ चेंडूत २० चौकार मारत ११२ धावा केल्या. क्रितिका यादवने ४८ धावा केल्या. आकृती भोईरने  दोन, पलक धरमशी आणि दिपीका भारियाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना प्रियंका राठोड आणि पलक धरमशीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. प्रियंकाने ३१ आणि पलकने २९ धावा केल्या. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजाना दडपणाखाली ठेवताना अलिनानाने तीन, प्रिशा देवरुखकर, विधी मथुरिया आणि  तन्वी परबने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. शतकविर महेक पोकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : व्हिक्टरी क्रिकेट क्लब : ४० षटकात ४ बाद २९३ ( महेक पोकर ११२, अलिना मुल्ला ६१, क्रितिका यादव ४८, आकृती भोईर ८-५९-२, पलक धरमशी ८-५९-१, दिपीका भारिया ३-२२-१) विजयी विरुद्ध स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब : ३०.१ षटकात ९१ ( प्रियंका राठोड ३१, पलक धरमशी २९, अलिना खान ८-१-२७-३, क्रितिका यादव ७-१-१८-१, प्रिशा देवरुखकर ६-१-२०-१, विधी मथुरिया २.१-३-१, तन्वी परब १-६-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : महेक पोकर (व्हिक्टरी क्रिकेट क्लब). 00000

Heading – ठाण्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये आता सर्वंकष स्वच्छता मोहीम

शनिवारपासून सिद्धेश्वर तलाव परिसरातून उपक्रमाला सुरुवात ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचविण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील वस्तीमधून या उपक्रमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात झोपडपट्टी परिसर स्वच्छ करण्याबरोबरच येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. तेव्हापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात ठराविक दिवशी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर, सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत. या मोहिमेत दैंनदिन साफसफाईबरोबरच मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यावर भर देण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. आयुक्त राव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, या उपक्रमात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय या भागातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. अशा ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात आज, शनिवारपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव भागातील वस्तीमधून होणार आहे. कोट शहरातील मुख्य रस्त्यांपाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छताविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. – मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका ००००

जरंडी गाव राज्यात रोल मोडेल करणार – डॉ. विकास मीना

सोयगाव : जरंडीचा उत्कृष्ट विकास आहे त्यामुळे जरंडी गाव आता सोलार वीज जोडणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवून जरंडी गावात आता जिल्हा परिषदेच्या वतीने सोलार वीज पुरविण्यात येईल व गाव राज्यात रोल…