Month: December 2024

 संविधान परिचय कार्यशाळा उत्साहात संपन्न 

 नवी मुंबई महानगरपालिकेची संविधान साक्षरतेच्या दिशेने नियोजनबध्द वाटचाल नवी मुंबई : भारताचे संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर आपल्या जीवनशैलीचे मार्गदर्शक आहे अशा शब्दात संविधानाचे महत्व विशद करीत माजी मुख्य आयुक्त श्री. जे.एस.सहारिया यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा थेट जनतेशी संबंध असल्याने महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्याला समाजासाठी उपयोगी पडण्याची ही उत्तम संधी असल्याचे जाणून काम करावे असे सांगितले. यादृष्टीने संविधानातील मूल्यांचा आपल्या कामकाजात कसा उपयोग होईल व यातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजातील शेवटच्या माणसाला कशी मदत होईल याचे भान राखून काम करायला हवे असे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान पर्वानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित संविधान परिचय कार्यशाळेमध्ये ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकातील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या ‘संविधान परिचय कार्यशाळे’प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त श्री. समीर उन्हाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे तसेच कार्यशाळेतील व्याख्यात्या कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम. अनुया कुंवर, संविधान अभ्यासक लेखक श्री. सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना  कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम.अनुया कुंवर यांनी संविधानाचे महत्व जाणून त्याची महती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करणारी पहिली महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव केला. कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरमच्या वतीने सुशासनासाठी करण्यात येणाऱ्या धोरणांची माहिती देत त्यांनी अबार्डिन अजेंडानुसार सुशासनासाठी प्रमाण मानके म्हणून निश्चित केलेल्या 12 तत्वांचे विवेचन केले. संविधानाने सांगितलेल्या मूल्यांचा आपण दैनंदिन कामकाजात वापर करीत आहोत काय? असा प्रश्न स्वत:लाच विचारून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आत्मचिंतन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. संविधानाचे अभ्यासक श्री.सुरेश सावंत यांनी हे ज्ञानस्मारक म्हणजे प्रेरणास्थान असून याठिकाणी आल्यानंतर समृध्द झाल्यासारखे वाटते असे सांगत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवी मुंबई संविधान साक्षर मोहीम’ राबविण्याचे सुव्यवस्थित नियोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. ही मोहीम राबविताना पहिल्या टप्प्यात संविधान परिचय वर्ग आयोजन व दुसऱ्या टप्प्यात घर घर संविधान साक्षर मोहीम राबविली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या नियोजित मोहीमेचा आराखडा सादरीकरणाव्दारे मांडत त्यांनी संविधान समजणे ही साक्षरतेची पहिली पायरी असल्याचे सांगितले व संविधानाची उद्देशिका हे तिचे सार असून उद्देशिकेतील मूल्यांचा अर्थ उलगडून सांगितला. नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समारोप करताना कार्यशाळेत विचारमंथन झालेल्या विविध मुद्दयांचा परामर्श घेतला. संविधानाने ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिले आहेत तशीच काही कर्तव्यदेखील सांगितली आहेत, त्यादृष्टीने लोकजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. मनुष्याचा विकास व्हावा हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करताना ‘मी इथे का आहे?’ असा प्रश्न प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:ला विचारला पाहिजे व आपल्याला जनतेसाठी काम करण्याची मोठी संधी महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणून मिळाली याची जाणीव ठेवावी असे ते म्हणाले. आपल्या अधिकारांचा वापर शिक्षा करण्यासाठी नाही तर माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी आहे याचे भान राखून काम करावे असे मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेने आधुनिक काळाला साजेशी संगणकीय ऑनलाईन कार्यप्रणाली अंगिकृत करीत नागरिकांसाठी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीम, माय एनएनएमसी ॲप विकसीत केले असून नागरिकांच्या तक्रारी सोडवणुकीसाठी नियोजनबध्द कार्यप्रणाली आत्मसात केली आहे तसेच थेट संवादी दृष्टीकोन ठेवला आहे असेही आयुक्तांनी सांगितले. व्याख्यात्यांनी मांडलेल्या बाबींवर सविस्तर भाष्य करताना समाजातील सर्व घटकांपर्यंत संविधान साक्षरता मोहीम पोहोचविण्यासाठी ठोस नियोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात ज्ञानकेंद्र म्हणून नावाजल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील उल्लेखनीय सुविधांची व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळात शासनाने निर्देशित केल्यानुसार ‘घर घर संविधान’ अभियान व्यापक स्वरुपात राबविले जाणार असून त्याचा प्रारंभ या संविधान परिचय कार्यशाळेने झाला. 00000

महालक्ष्मी मंदिराबद्दल मला खूप सात्विक अनुभव आहे- डॉ. अनिल काकोडकर

केतन खेडेकर मुंबई : मला मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबद्दल खूप श्रध्दा असून सात्विक अनुभव आहे. तसा मी आस्तिक आहे. असे उद्‌गार डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले. महालक्ष्मी मंदिरामध्ये “श्री महालक्ष्मी नमोस्तुते” या कॉपी टेबल पुस्तकाचे अनावरण झाले त्यावेळी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले आई आणि मी मुंबईत आलो तेव्हा परिस्थिती हलाखीची होती. शिकण्यासाठी मुंबई गाठली. राहता येईल की नाही अशी दोलायमान परिस्थिती निर्माण झाली. माझ्या आईने महालक्ष्मीला नवस केला की, गौरी गणपती दरम्यान देवीची ओटी भरण्यास येईन, १९५६ सालापासून आजतागायत जवळजवळ ६७ वर्षे महालक्ष्मीला येतो (कोरोनाचा काळ सोडला), पूर्वी पाठीमाने खडकांवर बसून लाटांच्या सान्निध्यात मूग भजी खात असे, पण आता कोस्टल रोड झाल्यामुळे ती मजा नाही. महालक्ष्मीच्या दर्शनाला येणा-या भाविकांची संख्या प्रचंड आहे. कालनिर्णयकार जयंत साळगावकर म्हणाले डॉ. काकोडकर यांची मिसाईल बनविण्यात खूप ताकद आहे. या तिन्ही देर्वीच्या मूर्त्यांमध्ये सरस्वती महत्वाची असून कालिका संहार करते तर लक्ष्मी पैसे देते, नमस्कार केला की प्रेरणा मिळते. मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष विजय गुपचूप म्हणाले डॉ. काकोडकरांना बघून आनंद मिळतो. काकोडकरांचे जीवन सामान्य माणसाला समर्पित आहे हिच त्यांची ओळख आहे. कार्यकारी विश्वस्त-चार्टड अकांउटंट शेखर दांडेकर म्हणाले या पुस्तकामुळे भक्तांना प्रेरणा मिळेल हे मोठे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचे काम घैसास यांनी उत्कृष्ट केलेले आहे. प्रत्येकाची वेळ सारखीच असते पण घैसास यांनी त्याचा योग्य उपयोग केलेला आहे. व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी आभार प्रदर्शनानंतर प्रत्येक भाविकाला विनामूल्य पुस्तकाची प्रत देऊन त्यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अशीश चेंबूरकर, प्रकाश राऊत, उदय लाड, ज्येष्ठ पत्रकार प्रविण मंत्री, चित्रा वैद्य आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. 000

मुरबाडच्या लेखणीचा गोवा राज्याच्या राजधानीत सन्मान…

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेली 20 वर्षांपासून पत्रकारिते मध्ये काम करत ,समता सामाजिक फाउंडेशनआणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत संघाचे प्रदेश अध्यक्ष, वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यभर सामाजिक काम करणारे, शांत संयमी, अभ्यासु पत्रकार शंकर करडे  त्यांच्या कामाची दखल घेत,गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया, एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने 2024 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन येथे,माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभहस्ते  सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी गोव्याचे आमदार रोडोल्फा फर्नांडिस, आरपीआय आठवले गटाचे,अध्यक्ष दिनेश उघडे, रमेश देसले, समाजसेवक भगवान भालेराव, दयानंद रातांबे, संतोष उघडे, ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, तसेच देशातुन व राज्यातून मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन गोवा बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ.बी एन खरात,यांनी केले होते. करडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी त्याचें विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या. ०००००

 दिव्यांगांच्या आरोग्यासाठी पायाभूत उपक्रमाचा शुभारंभ

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने घेतला पुढाकार   मुंबई : स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणाऱ्या बोरिवली पूर्व येथील संस्थेने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग(HMPD) हा उपक्रम सुरू केला आहे. जवळजवळ 100 दिव्यांग व्यक्ती आणि 40 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका अनोख्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या समाजात दुर्लक्षित आहे. दिव्यांग व्यक्तीला आलेल्या अपंगत्वामुळे वयोमानपरत्वे त्यांच्या शारीरिक अडचणी वाढत जातात आणि या शारीरिक व्याधी त्याचे जीवन अत्यंत त्रासाचे करतात आणि म्हणूनच जर वेळीच बेसिक हेल्थ चेकअप, डॉक्टरांचे मार्गदर्शन, योग्य ती औषधे, आवश्यक फिजिओथेरपी अशी बेसिक हेल्थकेअर जर दिव्यांग व्यक्तींना अत्यंत वाजवी दरात उपलब्ध झाली तर त्यांचे एकंदरीत शारीरिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होईल, या एकमेव उद्देशाने हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग (HMPD)हा अभिनव उपक्रम स्नेहज्योत संस्थेने हाती घेतला आहे, ज्याचा शुभारंभ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील एन आय सी ऑडिटोरियम मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करण्यात आला. गेली जवळजवळ 35 वर्षाहून जास्त मेडिकल क्षेत्रात अनुभव असणारे प्रोफेसर डॉ. हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वाला येणार आहे. HnG पॅथॉलॉजी आणि डायग्नोस्टिक हेल्थकेअर, आशा हेल्थकेअर, NM मेडिकल सेंटर या उपक्रमाशी संलग्न आहेत. या उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना आयुष्मान कार्ड काढून देण्यात येईल, आवश्यक असणाऱ्या टेस्ट वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच त्यांच्या विभागात वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आवश्यकता भासल्यास मोठ्या सर्जरीज मोफत करून घेण्यात येऊ शकतील, अशा पद्धतीचा आरोग्य संबंधीचा डेटाबेस एका हेल्थ डेस्क च्या माध्यमातून करता येईल का? या दिशेने या उपक्रमाचा विस्तार केला जाईल. कृष्णा शेठ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दृष्टिहीन तायक्वांडो प्लेयर चा ‘स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच आपल्या अपंगत्वावर मात करून झोमॅटो डिलिव्हरी बॉय चे काम करत स्वतःचे आयुष्य स्वावलंबनाने जगणाऱ्या श्री हरिशंकर शर्मा यांचा ‘स्नेहज्योत धैर्यशील व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ देऊन गौरव करण्यात आला. या दोघांनी आपले अनुभव कथन करत उपस्थितांसमोर एका वेगळ्या जिद्दीचे आणि मनोबलाचे उदाहरण ठेवले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व दिव्यांग मुलांना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल पार्क मधील लायन सफारी टूर घडवून आणली आणि मग मस्तपैकी चिंचा, बोरे, कैऱ्या खाऊन सर्व दिव्यांग व्यक्तींच्या दिवसाची आनंदाने सांगता झाली. या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे तहसीलदार अतुल सावे, अकाउंटंट रविदास गवळी, तलाठी चिराग सुळे, फेरो इक्विपचे रोड्रिक्स फर्डी, सुविद्या प्रसारक संघाचे श्री महादेव रानडे, एन एम मेडिकल सेंटरचे प्रतिनिधी हर्षिल परमार, स्नेहज्योत शुभचिंतक सौ अहिल्या कुलकर्णी, डॉ. श्रीकांत ठाकूर, एस एस बॅग्स चे संजय दळवी तसेच प्रोफेसर हेमंत शिंदे आणि त्यांची टीम उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त विजय कलमकर यांनी केले.  लायन सफारी ही इनरव्हील क्लब ऑफ मुंबई, दहिसर यांच्याकडून प्रायोजित करण्यात आली होती. हे दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य स्नेहज्योत परिवारातील सर्व सेवाव्रतींमुळेच होऊ शकते, असे संस्थेच्या संस्थापिका व सचिव सौ सुधा वाघ यांनी आवर्जूनपणे नमूद केले. ००००

नाशिक शहरासाठी ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची गरज,

 गतवर्षीच्या वापरापेक्षा ५३२ दशलक्ष घनफूट अधिक   हरिभाऊ लाखे नाशिक : जलशुध्दीकरण केंद्रात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पाणी, वाहिन्यांमधील गळती, पाणी चोरी, अनधिकृत जोडण्या, पाणी मापनासाठी मीटर नसणे वा संथ चालणे आदी कारणांस्तव ४३ टक्के पाणी महसूल नसणारे आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी विहित मापदंडापेक्षा जादा पाण्याची आवश्यकता भासते. याकडे लक्ष वेधत शहरासाठी २०२४-२५ या वर्षात ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. महापालिकेला गतवर्षी ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले होते. दुष्काळी स्थितीत अतिरिक्त ४०० दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याची मुभा दिली गेली होती. या काळात महापालिकेने प्रत्यक्षात अधिक म्हणजे ५६६८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केला. आता आगामी वर्षात म्हणजे १५ ऑक्टोबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या २९० दिवसांसाठी गंगापूर, दारणा धरण (चेहेडी बंधारा) आणि मुकणे या धरणांमधून एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी वापरलेल्या पाण्यापेक्षा हे प्रमाण ५३२ दशलक्ष घनफुटने जास्त आहे. शासन निकषानुसार शहरात प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर पाणी वापर गृहीत धरला जातो. या सुत्रानुसार एकूण लोकसंख्येला लागणारे पाणी लक्षात घेऊन पाणी आरक्षित केले जाते. उपरोक्त निकषापेक्षा अधिक प्रमाणात प्रतिमाणसी पाणी वापर होत आहे. मागील दुष्काळी वर्षात राजकीय दबावामुळे मनपाने अखेरपर्यंत पाणी कपातीचे धारिष्ट्य दाखवले नव्हते. वाढीव पाणी आरक्षणाचा निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील आकस्मित पाणी आरक्षण समितीकडून घेतले जातात. एरवी पावसाळा संपताच या अनुषंगाने बैठक पार पडली. त्यासाठी १५ ऑक्टोबर रोजीच्या धरणांतील जलसाठ्यांचा आधार घेतला जातो. आचारसंहिता व नवीन सरकार स्थापन होत असल्याने ही प्रक्रिया थांबलेली आहे. पालकमंत्री नियुक्तीनंतर या विषयावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले जाते. २६ लाख लोकसंख्या गृहित पिण्याच्या पाण्याकरिता २०२४-२५ वर्षासाठी मागणी नोंदविताना महापालिकेने २३ लाख निवासी आणि तीन लाख तरती अशी एकूण २६ लाख लोकसंख्या गृहीत धरली आहे. बिगर निवासी वापरात शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये, रेल्वे स्थानक, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय व खासगी रुग्णालये, तरण तलाव, अग्निशमन दल यांची गरजही समाविष्ट आहे. शहरात दोन लाख पशूधन असल्याचा अंदाज आहे. कोणत्या धरणातून, किती मागणी ? गंगापूर धरण समूह – ४५०० दशलक्ष घनफूट दारणा धरण (चेहेडी बंधारा) – २०० दशलक्ष घनफूट मुकणे धरण – १५०० दशलक्ष घनफूट

आवक घटल्याने टोमॅटो, मटारच्या दरात वाढ

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आणि मटारची आवक कमी होत असून दर वधारले आहेत. मागील एक महिन्यापासून टोमॅटो दर आवाक्यात होते परंतु टोमॅटोच्या दराने पुन्हा उसळी…

झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !

मुंबई: पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोकं वर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचे वातावरण आहे. मात्र  ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत,  आरोग्य प्रशासनाने ठाणे…

नववर्षात पुणेमुंबई प्रवास सुसाट

 ठाणे खाडी पूल तीनच्या दुसऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण   मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून पुणे – नवी मुंबई, मुंबई प्रवास सुसाट होण्याची शक्यता आहे. ठाणे खाडी पूल ओलांडून मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला येण्यासाठी दोन खाडी पूल सध्या सेवेत दाखल आहेत. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरून धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत ठाणे खाडी पूल – २ वरील वाहनांची संख्या अधिक असून या पुलावरील भार वाढत आहे. या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. तसेच वाहनांना कोंडीत अडकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल ३ चे काम हाती घेतले आहे. १.८३७ किमी लांबीच्या आणि ठाणे खाडी पूल-२ ला समांतर तीन-तीन मार्गिका असलेल्या या खाडी पूल ३ च्या प्रत्यक्ष कामाला २०२० मध्ये सुरुवात झाली. याविषयी एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दक्षिणेकडील मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ उजाडणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ ही मार्गिका सेवेत दाखल करण्यात येईल. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुणे-नवी मुंबई, मुंबई प्रवास खाडी पूल ३ वरून करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे विलंब आतापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम सुरू झाल्याबरोबर आलेले करोना काळ आणि तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला. मागील एक-दीड वर्षांपासून एमएसआरडीसीने कामास वेग देऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेच्या उत्तरेकडील मार्गिकेचे काम पूर्ण केले आणि ही मार्गिका ऑक्टोबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल केली. मुंबई – नवी मुंबई, पुणे प्रवास अतिवेगवान झाला आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडील, पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा वाहनचालक-प्रवाशांना आहे. 0000

स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या !

 ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांचे ठामपा आयुक्त सौरव राव यांना पत्र   ठाणे : स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ठाणे शहरातून रोज लाखो टन कचरा, शहराच्या विविध प्रभागांतून गोळा केला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत याचे नियोजन केले जाते. सद्यस्थितीत ठाणे शहरातील स्वच्छतेसंदर्भात, समाधानकारक परिस्थिती असली तरी, ज्या वाहनांतून कचरा गोळा केला जातो किंवा वाहून नेला जातो, त्या वाहनांच्या स्वच्छतेबाबत मात्र, ‘आनंदी-आनंद’ असून, ठामपाच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनांची अत्यंत दुरवस्था झालेली पहावयास मिळत आहे. यातील बहुतांश वाहने अस्वच्छ असतात आणि या वाहनांतून कचरा टाकून दिल्यानंतरही, त्यामध्ये कचरा तसाच चिकटलेला दिसून येतो. परिणामी, गाडी कचऱ्याने भरलेली असो वा नसो, अस्वच्छतेमुळे या वाहनांतून कायमस्वरुपी दुर्गंधी येतच असते. याचा विपरीत परिणाम हा, अशा कचरावेचक वाहनांवर कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर होत असतो. “कचरा गोळा करणारे कामगार हे, डॉक्टरांप्रमाणेच काम करीत असतात; कारण, ते स्वच्छतारक्षकाच्या भूमिकेतून, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत असतात!” अशाप्रकारचे विधान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते, याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून, ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या वाहनांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे शहरातील कचरा गोळा करुन, शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांच्या वाहनांची झालेली दुरवस्था तर, ठामपाचे आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची वाहने टापटीप असणे, हा विरोधाभास ठाण्यासारख्या सुसंस्कृत नगरीला नक्कीच भूषणावह नाही, याची आपण प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी उपहासात्मक टिपणी धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढते जीवघेणे प्रदूषण पाहाता, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अन्यथा, भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा बोजा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पंडित यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. ठाणेकर नागरिक हे ‘करदाते’ आहेत, ठाणेकरांच्या पैशातूनच शहरातील सोयी-सुविधा जनतेला पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणे हीदेखील एक महत्त्वाची सुविधा असून, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त वाहने शहरात फिरणे, त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे, हा ठाणेकर करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे लक्षात घेऊन, यापुढे ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणेकामी, महापालिका प्रशासनाला आपण योग्य त्या सूचना देऊन, स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ००००

युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भूषण साळुंखे

पनवेल : दैनिक भास्करचे रायगड जिल्हा प्रतिनिधी भूषण साळुंखे यांची युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार…