Month: December 2024

डॉ. भागवतांच्या विधानावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे…

घ्या समजून राजे हो अविनाश पाठक समाजात प्रत्येक जोडप्याला किमान तीन अपत्य असावीत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरक संघ चालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केले…

महा वने लावावी नानाविध

संविधान कीर्तन मालिका शामसुंदर महाराज सोन्नर भाग सहा संतांच्या प्रबोधन चळवळीने मांडलेल्या सुधारणावादी विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात कसे उमटले आहे, याचा धांडोळा आपण घेत आहोत. भारतीय संविधानाच्या अनुछेद 12 ते…

राजावाडी क्रिकेट क्लबचा मोठा विजय

ठाणे : क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्याचा १३१ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या मर्यादित ४० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दणदणीत पराभव केला. राजावाडी क्रिकेट क्लबने ५ बाद २३६ धावांचा बचाव करताना माटुंगा जिमखान्याला ३३ षटकात १०५ धांवावर गुंडाळत दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय माटुंगा जिमखान्यासाठी फायदेशीर ठरला नाही. क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेने अर्धशतकी खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. क्षमाने १२ चौकारासह ६३ धावांची खेळी केली. निव्याने नऊ चौकार मारत ५३ धावा केल्या. दिक्षा पवारने नाबाद ३३ आणि किमया राणेने २४ धावा केल्या. माटुंगा जिमखान्याच्या त्रिशा परमारने दोन, समीक्षा घाडगे, अनन्या शेट्टी आणि रेनी फर्नांडेझने प्रत्येकी एक बळी मिळवले. उत्तरादाखल राजावाडी क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवताना थोड्या थोडया धावांच्या फरकाने फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून विजय साकारला. पराभूत संघाकडून रेनी फर्नांडेझने सर्वाधिक २७, तिशा कपूरने नाबाद १७ आणि गार्गी बांदेकरने १७ धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. विजयी संघाच्या क्षमा पाटेकर, वैष्णवी पोतदार, निव्या आंबरे आणि तनिशा धनावडेने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. निवेदी जैतपालने एक बळी मिळवला. क्षमा पाटेकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : राजावाडी क्रिकेट क्लब : ४० षटकात ५ बाद २३६ ( क्षमा पाटेकर ६३, निव्या आंबरे ५३, दिशा पवार नाबाद ३३, किमया राणे २४, त्रिशा परमार ७-१-३२-२, समीक्षा घाडगे ३-१९-१, अनन्या शेट्टी ८-३८-१, रेनी फर्नांडेझ ८-५३-१) विजयी विरुद्ध माटुंगा जिमखाना : ३३ षटकात सर्वबाद १०५ ( रेनी फर्नांडेझ २७, तिशा नायर नाबाद १७, गार्गी बांदेकर १७, निव्या आंबरे ८-१-२१-२, क्षमा पाटेकर ५-२०-२, वैष्णवी पोतदार ५-२२-२, तनिशा धनावडे ५-२१-२, निवेदी जैतपाल ४-९-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – क्षमा पाटेकर.

‘मुंबई स्पोर्ट्स २ रे ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’ आणि ‘मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान

मुंबई, मुंबई स्पोर्ट्स नुकतेच “स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर” व “मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट” चे पारितोषिक वितरण केले. हे पुरस्कार प्रवीण शेट्टी – अध्यक्ष, बंट्स संघ, आर. के. शेट्टी प्र. कार्यवाह बंट्स संघ, प्रदीप गंधे, रविराज ईळवे (कामगार आयुक्त), जय कवळी, उदय देशपांडे, जया शेट्टी, भास्कर सावंत आदी खेळातील दिग्गजांकडून वितरीत करण्यात आले. बक्षीस वितरणानंतर खेळाडूंनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या त्या पुढील प्रमाणे. ध्रुव सितवाला : त्यांना मुंबई स्पोर्ट्सकडून “स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24” पुरस्कार प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की या पुरस्काराची रक्कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख) मुंबई स्पोर्ट्सतर्फे भारतीय सैन्याच्या विधवांसाठीच्या निधीसाठी देणगी म्हणून दिली जावी. त्यांच्या या कृतीने ते फक्त त्यांच्या खेळाचेच चॅम्पियन नाहीत, तर हृदयानेही चॅम्पियन आहेत हे दाखवून दिले. अश्वार्या मिश्रा : यांनी आपला संदेश वडील आणि भाऊ यांच्या माध्यमातून पाठवला, त्यांनी तिच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. त्यांनी भारतातील अॅथलेटिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी आदिले सुमारिवाला यांचे आभार मानले. तसेच “मुंबई स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24” पुरस्कारासाठी मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. अक्षन के. शेट्टी : यांचा पुरस्कार त्यांचे वडील श्री करुणाकर शेट्टी यांनी स्वीकारला, जे पोइसर जिमखान्याच्या यशस्वीतेमागील मुख्य व्यक्तिमत्त्व आहेत. अक्षन यांनी मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार म्हणजे घरच्यांनी आपल्या व्यक्तीला दिलेला सन्मान असल्याचे सांगितले. कुणाल कोठेकर : यांनी मुंबई स्पोर्ट्सने खेळाडूंना सन्मानित करण्याचा हा उत्कृष्ट उपक्रम असल्याचे सांगितले व सर्वांचे आभार मानले. रुतुजा खाडे : यांनी मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की मुंबईच्या खेळाडूसाठी हा पुरस्कार मिळणे हे अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. आमच्या कामगिरीची दखल मुंबईतील संपूर्ण खेळ जगात घेत आहे याचा अभिमान असल्याचे स्पष्ट केले. सोनाली बोराडे : यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. तसेच यामुळे तिचा हुरूप वाढल्याचे सांगितले आणि मुंबई स्पोर्ट्सचे आभार मानले. नताशा जोशी : पॅरा डेफ ऑलिम्पिक शूटर, यांनी सांगितले की मुंबई स्पोर्ट्स दरवर्षी खेळाडूंना पुरस्कार देऊन उत्तम कार्य करत आहे. मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेला सन्मान तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल आणि भविष्यातील मुंबईतील खेळाडूंना प्रेरणा देईल. मिलिंद वागळे : क्रिकेट समालोचक, यांनी मुंबई स्पोर्ट्सचे मनःपूर्वक आभार मानले आणि पद्मश्री उदय देशपांडे, त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून आनंद व्यक्त केला. भाग्यश्री सावंत : यांच्या आईने पुरस्कार स्वीकारला व अशा प्रकारे पहिल्यांदाच सन्मान झाल्याचे सांगितले. प्रदीप गांधे  : “श्री मेजर ध्यानचंद लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड” विजेते, यांनी सांगितले की मुंबई स्पोर्ट्सने मुंबईतील खेळाडूंना त्यांच्या यशासाठी सन्मानित करण्याची अनोखी प्रथा सुरू केली आहे. त्यांनी मुंबई स्पोर्ट्सचे आभार मानले आणि खेळासाठी मुंबईत आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी सर्व खेळाडूंनी एकत्र यावे, असे आवाहन केले. जय कवळी : राजकीय पक्ष मुंबईतील खेळांसाठी काय उपाय योजना करणार आहेत?  खेळासाठी “स्पोर्ट्स लॉबी” तयार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले व त्या “स्पोर्ट्स लॉबी”ने राजकीय पक्षांकडे पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षंनी मुंबईतील खेळांचा व त्याच्या विकासाचा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर केला पाहिजे व त्याची अंमलबजावणी सुध्दा केली पाहिजे असे आवर्जून सांगितले. स्पोर्ट्स कोड तारक कि मारक :  स्पोर्ट्स कोडवर राजू भावसार, क्रीडा पत्रकार महेश विचारे व अॅड. नंदन कामत यांनी आपले परखड विचार मांडले व त्यातून राजू भावसार यांनी स्पोर्ट्स कोड तारकच असल्याचे सांगितले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला बंट्स संघाने त्यांचे सभागृह व भोजन व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली होती. या समारंभाचे सूत्रसंचालन क्षितीज वेदक यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळ तोरसकर यांनी केले.

महाराष्ट्र जिद्दीने खेळला हाच ‘सुवर्ण विजय’ – संदीप तावडे

मुंबई : ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने आणखी एक सुवर्ण विजय मिळवला. या विजयाचे महत्त्व विशद करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे शासकीय परिषद सदस्य संदीप तावडे यांनी संघाच्या जिद्दीचे आणि कौशल्याचे कौतुक केले. मातीचा गुण आणि जिद्द विजयाचा मार्ग दाखवतो “प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचा जो आपल्या मातीचा गुण आहे, तोच आपल्याला विजयाच्या मार्गावर नेतो. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या विजयाबद्दल खात्री होती; आम्हाला फक्त तो किती गुणांनी जिंकतो हे महत्त्वाचे वाटत होते,” असे तावडे यांनी नमूद केले. ओडिसाचा आव्हान आणि महाराष्ट्राची जिद्द ओडिसाच्या संघाने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली होती. त्यांनी काही नवीन तांत्रिक कौशल्ये विकसित केली होती, परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ती जिद्दीने पार केली. “ड्रीम रनसारखे नवीन नियम महाराष्ट्राच्या खेळाडूंवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत, कारण तीनही फळीतील खेळाडूंनी मजबूत संरक्षण केले. इतर संघांवर मात्र या नियमांचा परिणाम दिसून आला,” असे तावडे म्हणाले. राज जाधवचा उत्कृष्ट खेळ “दुसऱ्या पाळीत संरक्षण करताना तिसऱ्या फळीतील दोन खेळाडू मैदानात उतरल्याने थोडेसे दडपण आले होते. परंतु राज जाधवने आपल्या उत्कृष्ट संरक्षणामुळे 1 मिनिट 40 सेकंद टिकून सामना सोपा केला,” असे त्यांनी सांगितले. संघाचा संपूर्ण विजय आणि भविष्यासाठी मार्गदर्शन तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी जिद्द, कौशल्य आणि कठोर परिश्रमाने सुवर्णपदक मिळवले आहे. “महाराष्ट्र खो-खो संघाचे यश भविष्यातही कायम राहील, आणि हे विजय नवोदित खेळाडूंना प्रेरणा देतील,” असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या संघाने आपल्या मातीतील जिद्द आणि सांघिक मेहनतीच्या जोरावर सुवर्ण विजय संपादन केला आहे. हा विजय महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव आहे. महाराष्ट्राच्या संघाच्या यशामागे जिद्द आणि मार्गदर्शनाचा हातभार – प्रशांत इनामदार ४३वी कुमार-मुली राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली. स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या आणि कुमार संघांनी अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी या स्पर्धेतील अनुभव आणि संघाच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रास कोर्टमुळे प्रारंभिक आव्हाने “या स्पर्धेतील क्रीडांगण ग्रास कोर्टचे होते, त्यामुळे सुरुवातीला खेळाडूंना या क्रीडांगणाशी जुळवून घेणे अवघड गेले. गवतावरून पाय घसरत असल्यामुळे खेळाडूंची दमछाक होत होती. तरीही त्यांनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीने या अडचणींवर मात केली,” असे प्रशांत इनामदार म्हणाले. नियोजनाचा अभाव आणि खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक राष्ट्रीय स्पर्धेतील नियोजनाचा अभाव स्पष्ट होत होता. “निवास व्यवस्था सुमार दर्जाची होती, परंतु भोजन व्यवस्था मात्र सर्वोत्तम होती. खेळाडूंसाठी सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना विश्रांती मिळाली,” असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन संघाच्या यशामागे प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. “डॉ. चंद्रजीत जाधव, सचिन गोडबोले आणि प्रशांत पाटणकर यांनी संरक्षण व आक्रमणासाठी योग्य धोरणांची आखणी करून खेळाडूंना बोनस गुण कसे मिळवावेत याबाबत मार्गदर्शन केले,” असे इनामदार यांनी नमूद केले. मॅटवर अंतिम सामना आणि सरावातील फरक “मॅटचे क्रीडांगण एकच असल्यामुळे संघांना अंतिम सामना थेट मॅटवर खेळावा लागला. मॅटचा पूर्ण अंदाज नसल्यामुळे महाराष्ट्राने जास्त फरकाने विजय मिळवला नाही, पण तरीही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या खेळाडूंचा सराव सकाळी व सायंकाळी होतो, परंतु तिथे दिवसभर सामने खेळवले जात होते, त्यामुळे काहीशी आव्हाने निर्माण झाली,” असे त्यांनी सांगितले. खेळाडूंचा जिद्दीने विजय “महाराष्ट्राच्या कुमार संघाने उपउपांत्यपूर्व फेरीतील कोल्हापूर विरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यांतही दोन्ही संघांनी जिद्दीने खेळत सुवर्णपदक मिळवले,” असे इनामदार यांनी सांगितले. प्रशांत इनामदार यांनी संघाच्या कठोर परिश्रम, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. राज्य निवड समिती आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ चंद्रजीत जाधव व कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले यांनी सर्वोत्तम संघ निवडला. त्यांचेही विशेष कौतुक. या विजयाने महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव वाढवला आहे. कठोर परिश्रम हेच महाराष्ट्राच्या मुलींच्या खो-खो संघाच्या विजयाचे रहस्य – प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले आहे. या विजयाबद्दल बोलताना संघाचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी यशाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला, तांत्रिक प्रशिक्षणाला, आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या भक्कम पाठबळाला दिले आहे. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आणि उत्कृष्ट संघनिर्मिती…

नवी मुंबईतील उत्तम माने यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १ सुवर्णपदक, ३ रौप्यपदक

अनिल ठाणेकर नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलमध्ये  मीनाताई ठाकरे स्टेडियमवर  ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ या दरम्यान महाराष्ट्र राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धा  संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत,  नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ  नागरिक संघाचे सदस्य उत्तम माने यांनी ६५+ वर्षावरील गटात सहभागी होऊन १ सुवर्ण पदक व ३ रौप्यपदक संपादन केली. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ८३० खेळाडू सहभागी झाले होते, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. उत्तम माने हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोंदी या गावचे रहिवासी असून ते नवी मुंबईत सानपाडा येथे स्थायिक झाले आहेत.  उत्तम माने यांचे सद्या ७० वय  असून तरुणांना लाजवेल अशी त्यांनी कामगिरी केली आहे. उत्तम माने यांनी हातोडा फेकमध्ये  सुवर्ण पदक जिंकले आहे तर भालाफेक मध्ये रौप्यपदक आणि थाळी फेक मध्ये रौप्यपदक तसेच ४ x १०० मीटर रिले स्पर्धेत ही रौप्यपदक जिंकले आहे. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे हस्ते पारितोषिक वितरण व स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धेसारख्या खेळविण्यात येतील – विहंग सरनाईक

 ५ वर्षात उभारणार ५० मैदाने अनिल ठाणेकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धेसारख्या खेळविण्यात येतील असे प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) चे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी केले. तसेच महायुतीचे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चवर मजबूत काम करत आहे .  म्हणून आपण सुद्धा क्रिकेट साठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम एकत्र करूयात आणि येत्या ५ वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर ५० मैदाने उभारण्याचा निर्धार ठेवून असे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे.स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) चे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य विकास पाटील, डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन चे सेक्रेटरी एम.डी.मराठे, अध्यक्ष जयंत वेलदे , सदानंद केळकर आदी उपस्थित होते. तर बाळाराम खोपकर यांनी सूत्रसंचालन केले ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 48 व्या एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. त्यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी वरील वक्तव्य केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या १६ वर्षांखालील स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्री माँ विरुध्द कल्याण येथील के सी गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. के सी गांधी स्कुल ने श्री माँ विद्यालय शाळेचा पराभव करत एन. टी. केळकर चषकावर आपले नाव कोरले. गेली दोन वर्ष श्री माँ विद्यालयाने हा चषक जिंकला होता. मात्र ह्या वर्षी के सी गांधी शाळेने पारितोषिक जिंकल्याने त्यांची हॅट्ट्रिक हुकली. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न, ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ४५ षटकांच्या या स्पर्धेत श्री माँ विद्यालय शाळेने प्रथम फलंदाजी करून ३४.४ षटकात ११७ धावांवर के सी गांधी शाळेच्या गोलंदाजांनी रोखले तर ११७ धावांचा पाठलाग करतांना श्री माँ विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत के सी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना ३० षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून ६ गडी राखून हा सामना जिंकला.

दणकून निवडून आलो तर ठणकावून उत्तर देऊ..!

  विश्वनाथ भोईरांचा माजी आमदार राजू पाटलांना टोला डोंबिवली :  ईव्हीएममशीन मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या भाजपा शिंदे यांची राजकीय खेळी सुरु असल्याची टिका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या टिकेला आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठणकावून उत्तर देत सांगितले आहे की राजू पाटील जिंकले असते तर त्यांनी हा मुद्दा उचलला नसता. ते पडले तसेच त्यांच्या विरोधात आम्ही लढलो म्हणून हा आकस असू शकतो. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. परंतू आता आम्ही दणकून निवडून आलो आहोत, तर ठणकावून उत्तर देतो असे भोईर म्हणाले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएममशीन वरुन सत्ताधाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. विविध मतदारसंघातून विरोधी उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मधील मत नोंदणीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे हे निवडणूक जिंकले आहेत. येथे शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईर व मनसेचे राजू पाटील यांचा पराभव झाला आहे. 66 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. याठिकाणी राजू पाटील व सुभाष भोईर यांनी जिल्हा प्रशासनाकडे येथील व्हीव्हीपॅट मशीनमधील मत मोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच राज्यातील सत्तातरणावरुन सध्या भाजपा आणि शिंदे गटात सुरु असलेले राजकीय नाट्यावर मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी भाष्य केले आहे. माजी आमदार पाटील म्हणाले, ईव्हीएमच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले..शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे.. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येतोय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झालेत.. वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ?? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीन मधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरले आहेत असे पाटील यांनी म्हटले आहे. 0000

‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे नुकतेच ‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालय बँकेचे उपाध्यक्ष श्री.सुनील खाडे उपस्थित होते. त्यांच्या…

– ‘गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर’

शिवसेना नेते विनायक राऊत यांचे वक्तव्य ठाणे : विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता झालेला पराभव विसरुन कामाला लागले पाहिजे. कारण, गुजरातच्या लबाडांचे लक्ष ठाणे, मुंबई महापालिकेवर असल्याने सर्वांनी जागृत रहा आणि कामाला लागा असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ठाण्यातील पदाधिकारी – कार्यकर्त्यांना केले. ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेना कार्यकर्त्याचा मेळावा ठाण्यातील खारकर आळी येथील एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मेळाव्याला संबोधित करत, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील पराभव विसरुन आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. ते पुढे म्हणाले, चोरांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडायचा असेल तर, एकजुटीने काम करा. महापालिका निवडणुका कधीही लागू द्या आतापासूनच कामाला लागा आणि ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडकवा असे आवाहन देखील विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले. या निवडणूकीत पैसा आणि यंत्रणेचा वापर कसा झाला हे सर्वांनी पाहिले. विरोधकांनी या निवडणूकीत सरळ मार्गे विजय मिळवलेला नाही. त्यामुळे ही लोक म्हणजे सत्तेला चिकटलेली गोचीड आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली. तसेच शिवसेना संपलेली नाही आणि संपवणाऱ्यांची अवलाद देखील जन्माला आली नाही, त्यामुळे घाबरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन विनायक राऊत यांनी उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक विश्वास उटगी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर समन्वय संजय तरे, संपर्कप्रमुख महेश नेणे, काँगेसचे जेष्ठ नेते मधु मोहिते, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका रेखा खोपकर, उपजिल्हा संघटिका संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ईव्हीएममुळे विरोधकांचा विजय झाला आहे. त्यामूळे खचून जाऊ नका, ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकवायला तयार रहा, असे आवाहन यावेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. तर, ही निवडणूक आपल्याला खूप काही शिकवून गेली. जेव्हा प्रचार करताना आम्ही फिरत होतो. तेव्हा ठाणेकर जोरदार स्वागत करत होते. अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव दिसून आला. मात्र, यामधून समजले हे ठाणे शिवसेनेचे होते आणि पुढे देखील शिवसेनेचेच राहील, असे मत शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केले.