सिंहस्थासाठी हवा स्वतंत्र कक्ष
३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली हरिभाऊ लाखे नाशिक : नियोजनासाठी दरवेळी आव्हानात्मक ठरणारा नाशिकचा सिंहस्थ अवघ्या २२ महिन्यांवर आला असून, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर दर मंगळवारी नियोजन बैठकाही सुरू झाल्या आहेत. एव्हाना सिंहस्थ नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होऊन तेथे पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक होते. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांची फाइल सरकारदरबारी पडून असल्याने नियोजनाला गती येण्यास अवधी लागणार आहे. नाशिकचा सिंहस्थ पावसाळ्यात होत असल्याने त्याचे नियोजन करणे आव्हानात्मक काम असते. साधू-महंतांसह लाखोंच्या संख्येने शाही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाचा कस लागतो. त्युामुळे १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. आता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सिंहस्थाची दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन बैठका झाल्या असून, स्वतंत्र सिंहस्थ कक्ष सुरू होणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थात ५० लाख साधू-महंत आणि पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. सर्व विभागांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी व जिल्हास्तरावर यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तातडीने स्थापन करणे आवश्यक आहे. सिंहस्थाचे नियोजन अनेक यंत्रणांना सोबत घेऊन करावे लागते. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता आहे. परंतु, या कक्ष स्थापनेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कक्षात ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासंदर्भातही जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, तो अद्याप धूळ खात पडला आहे.
