महात्मा गांधी विद्यामंदिरमध्ये `मराठी गौरव सन्मानपत्र’ सोहळा संपन्न कल्याण : मुलांचे शालेय शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे व ते शिक्षण सर्वोत्तम असतें हे विविध शैक्षणिक तज्ञांनी अधोरेखित केलेले आहे. मात्र भारतीयांवर असलेला इंग्रजीचा प्रभाव यामुळे पालक मातृभाषा मराठीमध्ये प्रवेश न घेता मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात मराठी शाळांच्या पटसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाहाविरुद्ध जाऊन मुलांना मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या पालकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम डोंबिवली येथील रेल चाइल्ड संस्था संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेने आयोजित केला होता. मातृभाषा मराठीतून शालेय शिक्षण घेणे चांगले असतें हे पटल्याने पाल्यांचे प्रवेश घेतल्याने शाळेची पटसंख्या वाढली व अभिजात , समृद्ध , संपन्न अशा मराठी या ज्ञानभाषेतून शिकण्याची सुवर्णसंधी पाल्यास दिली म्हणून `मराठी गौरव सन्मानपत्र’ देऊन पालकांचा नुकताच गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुणे येथील मराठी काका अनिल गोरे, गणेश मंदिर संस्थान अध्यक्ष अलका मुतालिक, सेवानिवृत्त एसीपी बाळकृष्ण वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप गवळी, रे.चा.संस्था कार्यवाह झरकर, कोषाध्यक्ष पटवर्धन, निमंत्रित सदस्य मंगेश देशपांडे, १४३ विधानसभा प्रमुख प्रल्हाद म्हात्रे, सीआरसी प्रमुख महेश्वरी आदी मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे अनिल गोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी माध्यमातून शालेय शिक्षणाचे उपयुक्तता तसेच शैक्षणिक फायदे अत्यंत रंजक माहितीद्वारे सांगितले. त्यांनी आवाहन केले कि पालक वर्गाने सर्व परिचितांना, नातेवाईकांना, मित्रांना मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास प्रेरित करावे. इंग्रजी शाळेत मुलांना घालून पालक चूक करत आहेत कारण मराठी माध्यमातील शिक्षण हे कस्तुरीमृगासारखे आहे. गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक पालकांशी संवाद साधताना म्हणाल्या की, मराठी शाळेची मुले जीवनामध्ये कुठेही कमी पडत नाही हा त्यांचा अनुभव आहे. मराठी शाळेतच मुलांच्या व्यक्तीमत्वाचा खरा विकास होतो व तेथेच मुलांचं भविष्य उज्वल आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर सारखी एखादी शाळा ` पालकांचा असा सत्कार करते व असा स्तुत्य उपक्रम राबवते हे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रल्हाद म्हात्रे यांचा माजी विद्यार्थी म्हणून ` मराठी गौरव सन्मानपत्र ‘ देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित पालकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रल्हाद म्हात्रे यांनी ५१००० रू. चा धनादेश शाळेला मदत म्हणून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयकुमार जोगी यांनी केले व सूत्र संचालन ललिता कुलकर्णी यांनी केले.