कुटुंब नियोजन जनजागृती पंधरवड्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ‘शून्य’

 

ठाणे : जिल्हा आरोग्य विभागातर्फे नुकतेच कुटुंब नियोजन जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये पुरुषांनी अधिक संख्येने सहभागी होऊन नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ” कुटुंब नियोजनावर बोलू काही ” असे घोषवाक्य असलेल्या या अभियानात पुरुष नसबंदी शास्त्रकियेची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र याकडे जिल्ह्यातील पुरुष वर्गाने पूर्णपणे पाठ फिरवली असून शून्य प्रतिसाद मिळाला आहे. तर या अभियानाच्या पंधरवड्यात ३१८ महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
लोकसंख्या वाढ ही जगाची मोठी समस्या आहे. गेल्या काही वर्षांत शहरी भागात एक किंवा दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेतला जातो. मात्र, ग्रामीण भागात आजही दोनपेक्षा अधिक अपत्ये जन्माला घातली जातात. शासनातर्फे कुटुंब नियोजनासाठी आणि त्याच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे, योग्य ते उपचार देणे, मोफत पद्धतीने दाम्पत्याला गोळ्या – औषधांचे वाटप करून देणे यांसारखे उपक्रम हाती घेण्यात येत असतात. मात्र पुरुष नसबंदीसाठी तयारच होत नसल्याचे सातत्याने दिसून येते. तर यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून नुकताच कुटुंब नियोजन जनजागृती पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये या मोहिम कालावधीत पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत असणारे गैरसमज दूर करून कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले होते.
तसेच या मोहिमेचे घोषवाक्य, “आजच सुरुवात करुया, पती-पत्नी मिळून कुटुंब नियोजनावर बोलुया” असे होते. ही मोहिम जिल्ह्यात २ टप्यात राबविण्यात आली. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत माहिती घेण्याकरीता विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. तर आशा व एएनएम, पुरुष नसबंदी पंधवड्याचा प्रचार व प्रसार कार्यक्षेत्रात करून कुटुंब नियोजनास पात्र जोडप्यांना भेटी देऊन पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याच्याशी निगडीत गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशन करुन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा स्वीकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र याकडे पुरुष मंडळींनी पूर्णपणे पाठ फिरवली तर दुसरीकडे महिलांनी पुढाकार घेऊन कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या.
जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कुटुंब नियोजन जनजागृती उपक्रमात पुरुषांच्या नसबंदीच्या शून्य शस्त्रक्रिया पार पडल्या. तर ३१८ महिलांनी या नाव नोंदणी करून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुरुषांनी यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र याला पुरुषांचा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची संख्या १ हजार ९६७ इतकी आहे. तर याच कालावधीत पुरुष नसबंदी शत्रक्रिया संख्या अवघी ४ असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
गर्भधारणा रोखण्यासाठी केली जाणारी नसबंदीची पारंपरिक शस्त्रक्रिया किंवा वारंवार त्या गोळ्यांचे सेवन केल्याने महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे अनेक अहवालतुन देखील समोर आले आहे. तर दुसरीकडे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया कमी वेळेत होते. मात्र तरीही पुरुखांची संख्या यात नगण्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *