अशोक गायकवाड
रायगड : जिल्हा उद्योंग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार, ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी दिली आहे.
विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार ‘राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यात प्रचालन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले आहे.
००००
