डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील सुभाष रोड. क्रांतीपासून ते अगदी मारूती मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारांच्या बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच ठेकेदाराने केलेल्या खोदाईमुळे या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फोडल्या आहेत. परिणामी फुटलेल्या जलवाहिन्यांतून गटरातील सांडपाण्याचा निचरा होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांच्या नळावाटे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी वितरीत होत आहे. दूषित पाण्याच्या प्रादुर्भावामुळे रहिवाशांना उलट्या, मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे मनसेचे ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे लक्ष वेधले आहे.
पश्चिम डोंबिवलीतील सुभाष रोडला असलेल्या नवापाडा भागात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी जुनी गटारे तोडली जात आहेत. वास्तविक हा रस्ता अरूंद आहे, त्यामुळे आधी एका बाजूचे काम पूर्ण करून नंतर दुसऱ्या बाजूचे काम हाती घेणे आवश्यक होते. मात्र सदर ठेकेदाराने काम घाईघाईत उरकून घेण्याच्या उद्देशाने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा यत्कींचीतही विचार केलेला दिसत नाही. दोन्ही बाजूंची गटारे खोदल्याने या रस्त्याला वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. वास्तविक पाहता वाहतूकीवर नियंत्रण आणण्यासाठी ठेकेदाराने स्वतःची माणसे ठेवणे आवश्यक होते. मात्र ते केले जात नाही. त्यातच जेसीबीच्या साह्याने जुने गटार तोडून खोदाई केल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक इमारतींना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तुटल्या आहेत. विश्वंभर दर्शन, यशराज होम, सुदामा टॉवर, घनश्याम कॉम्प्लेक्स, मातृप्रेरणा सोसायटी, कुलकर्णी सदन, उमाकांत निवास, निळकंठ तिर्थ, व्यंकटेश सदन आदी अनेक इमारतींना दूषित पाणी पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रहिवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कारवाई करावी. अन्यथा या भागातील रहिवाशांच्या आरोग्य रक्षणासाठी आंदोलन करावे लागेल, असाही इशारा प्रल्हाद म्हात्रे यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, प्रल्हाद म्हात्रे यांचे तक्रारपत्र मिळाले आहे. त्यानुसार कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. तेथे काँक्रीटचे काम सुरू आहे. साठलेले पाणी काढून टाकण्याची ताकीद एमएमआरडीएच्या ठेकेदाराला दिली आहे. रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात देखिल सूचना दिल्या आहेत. दूषित पाण्याचे वितरण होत असेल तर पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता उदय सूर्यवंशी यांनाही तशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
