नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या

 

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या व्होल्वो वातानुकूलित बसेसमध्ये ‘बुक्स इन बस’ (बसमधील चालते फिरते ग्रंथालय) हा आगळावेगळा उपक्रम जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात आला असून त्याला अगदी सुरुवातीपासूनच नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. लांब अंतराच्या प्रवासात प्रवाशांना उत्तम पुस्तके वाचता यावीत व या माध्यमातून त्यांच्या माहिती व ज्ञानात भर पडावी या संकल्पनेतून लेट्स रीड फाउुंडेशन या संस्थेच्या सहयोगाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरला होता.

तथापि सदर बसेसमधील लघु ग्रंथालयात ठेवण्यात आलेली पुस्तके वारंवार हाताळली गेल्याने जीर्ण झाली असल्याबाबत प्रवाशांकडून वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. त्याचप्रमाणे सुरुवातीला पुस्तके ठेवल्यानंतर दरम्यानच्या प्रसिध्द झालेली लोकप्रिय पुस्तकांचा समावेश बसेसमधील लघु ग्रंथालयात असावा अशीही मागणी रसिक वाचकांकडून करण्यात येत होती. त्या अनुषंगाने सदर लघु ग्रंथालयातील पुस्तके बदलून त्याठिकाणी नवी कोरी वाचनीय मराठी व इंग्रजी भाषेतील पुस्तके ठेवण्यात आली असून या लघु ग्रंथालयाचे नुतनीकरण करण्यात आलेले आहे.

सद्यस्थितीत ‘बुक्स इन बस’ (बसमधील चालते फिरते ग्रंथालय) हा अभिनव उपक्रम बस मार्ग क्र.42(EV-AC)- वाशी रेल्वे स्टेशन ते डोंबिवली, तसेच बस मार्ग क्र.56 (Volvo AC) – मानसरोवर रेल्वे स्टेशन ते कळंबोली पोलीस मुख्यालय, आणि बस मार्ग क्र.62 (EV-AC) – वाशी रेल्वे स्टेशन ते कल्याण व बस मार्ग क्र.73(Volvo AC)- पनवेल रे.स्थानक ते कल्याण या मार्गांवरील काही बसेसमध्ये कार्यान्वित आहे.

या बसेस मधील लघु ग्रंथालयात आत्मचरित्रे, मनोरंजन कथा, कविता व कथा संग्रह, ऐतिहासिक साहित्य अशा विविध नामवंत लेखकांच्या मराठी तसेच इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. या लघु ग्रंथालयाचे नुतनीकरण करुन नवीन वाचकप्रिय पुस्तके उपलब्ध करुन दिल्याबद्दल एनएमएमटी प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *