अनिल ठाणेकर
ठाणे :भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाण्यातील नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे भरविण्यात येत आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने जांभळी नाका व पाचपाखाडीत शिबिरे सुरू झाली आहेत. शहरातील शेकडो नागरिकांना विविध दाखले मिळविण्याची प्रक्रिया माहिती नाही. त्यामुळे नागरिकांना सरकारच्या कल्याणकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी शहराच्या सर्व भागात शिबिरे भरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जांभळी नाका येथील चिंतामणी ज्वेलर्ससमोर व पाचपाखाडीतील परमार्थ निकेतनसमोर शिबीर सुरू झाले असून, ते ५ जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर कळवा स्टेशन परिसरात ७ ते ९ जानेवारीपर्यंत, राबोडीतील आकाशगंगा रस्त्यावर १० ते १२ जानेवारीपर्यंत, मुंब्रा येथील बाबाजी सखाराम पाटील विद्यामंदिरात १४ ते १६ जानेवारीपर्यंत, मनोरमा नगर येथील डी. ए. कॉलेजपर्यंत १७ ते १९ जानेवारीपर्यंत आणि ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या परबवाडीत २१ ते २३ जानेवारीपर्यंत शिबिरे भरविली जाणार आहेत. या शिबिराला भेट देऊन नागरिकांनी अत्यावश्यक कागदपत्रे तयार करून घ्यावीत, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे. जांभळी नाका व पाचपाखाडी येथे झालेल्या शिबिराला भाजपाचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, प्रदेश सचिव संदीप लेले, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले, माधवी भुवड, सचिन केदारी, संतोष साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
००००