डोंबिवली : राज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत. महाआघाडीचे सरकार कोसळून अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. तरीही महावितरणच्या विद्युत बिलांवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हेतुपुरस्सर असेल तर चौकशी करून संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळून अडीच वर्षे उलटून गेली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. त्यानंतर महायुतीचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तेही जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर आहेत. तरीही जळगावात महावितरणने पाठविलेल्या विद्युत बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहक काहीसे शॉक झाले आहेत. यावरच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हेतुपुरस्सर या गोष्टी होत असतील आणि ज्यामुळे हे प्रकार घडत असतील तर त्याच्यावर नक्कीच करावाई केली जाईल.
दरम्यान भाजपाच्या राज्य आणि देश राज्यव्यापी संपर्क अभियानातर्फे डोंबिवलीत रविवारी संघटन पर्व उपक्रमांतर्गत प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी या अभियानाला सुरूवात केली. या अभियानाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे समाधान आमदार चव्हाण यांनी व्यक्त केले.
