मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
इन्शोरकोट, मुंबई महानगर पालिका विशेष व्यावसायिक गटाच्या अंतिम फेरीत दाखल
मुंबई:- इन्शोरकोट, मुंबई महानगर पालिका यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या विशेष व्यावसायिक गटात अंतिम फेरीत धडक दिली. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात इन्शोरकोट स्पोर्टस् ने पी. डी. हिंदुजा रुग्णालयाला ३५-१४ असे सहज नमवित अंतिम फेरी गाठली. पहिला लोण देत इन्शोरकोटने मध्यांतराला १९-०८ अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर देखील त्याच गतीने खेळ करीत सामना एकतर्फी केला. आदित्य शिंदे, विजय या विजयाचे शिल्पकार ठरले. आकाश कदम, संतोष वारकरी यांचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई महानगर पालिकेने मध्य रेल्वेचे आव्हान २८-११ असे संपविले. पूर्वार्धात १४-०९ अशी आघाडी घेणाऱ्या पालिकेने उत्तरार्धात आपला खेळ आणखी उंचावत १७ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. दर्शन वाघ, सुबोध शेलार यांच्या चढाई पकडीच्या खेळामुळे हा विजय शक्य झाला. या अगोदर झालेल्या उपांत्य पूर्व सामन्यात पी. डी. हिंदुजाने मुंबई पोलीस ब ला (३२-२२) असे, इन्शोरकोटने माझगाव डॉकला (३८-२२) असे, तर मध्य रेल्वेने न्यू इंडियाला २४-२३ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.