भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ग्रामस्थांचा प्रतिसाद
भिवंडी : भाजपाच्या संघटन पर्व-सदस्यता नोंदणी अभियानाला भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी केंद्रीय राज्यमंत्री व भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अभियान प्रभारी कपिल मोरेश्वर पाटील यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये पोचून ग्रामस्थांना नोंदणीसाठी आवाहन केले. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत विक्रमी संख्येने नोंदणी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात भाजपाकडून राज्यभरात आज सदस्यता नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अभियान प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या अभियानासंदर्भात कपिल पाटील यांनी नियोजनाची बैठक घेऊन विक्रमी नोंदणीसाठी प्रयत्न सुरू केले होते.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काल्हेर, कोपर आणि वळ येथील बूथवर पोचून कपिल मोरेश्वर पाटील यांनी नोंदणी करून घेतली. त्याला ग्रामस्थांकडूनही चांगला प्रतिसाद लाभला. भिवंडी तालुक्यातील इतर काही गावांमध्येही संपर्क साधून कपिल पाटील यांनी ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. त्यानंतर ग्रामस्थांनी मोबाईलवरुन भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. आज दिवसभरात भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १० हजारांहूनही अधिक नोंदणी होईल, असा विश्वासही व्यक्त केला. या अभियानात तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे यांच्यासह पदाधिकारीही सहभागी झाले आहेत.
000000