डोंबिवली : कल्याणच्या चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा विशाल गवळी याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली होती. निर्भया बचाओ समितीच्या कल्याण शाखेने घेतलेल्या पुढाकाराला कल्याणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन सिंग यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या स्वाक्षरी मोहिमेत हजारो नागरिक स्वत:हून सहभागी झालेले दिसून आले.
कल्याण रेल्वे स्टेशनला जाणारे आणि बाहेर पडणारे, तसेच बस आगारातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांनी स्वाक्षरी करून आपला संताप व्यक्त केला. निरागस बालिकेचा मारेकरी विशाल गवळी याच्या विरोधात पोलिसांनी लवकरात लवकर आरोपपत्र न्यायालयात दाखल करावे. जलदगती न्यायालयात या खटल्याची सुनावणी घेण्यात यावी. सरकारी वकीलांची लवकर नियुक्ती करून हा खटला खटला दैनंदिन चालेल यादृष्टीने शासनाने अग्रक्रमाने पुढाकार घ्यावा. या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायाधीश नियुक्त करण्यात यावे. लवकरात लवकर या खटल्याची सुनावणी पूर्ण करून मारेकरी विशाल गवळी याला फाशी होईल यादृष्टीने शासनाने पावले उचलावीत, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निर्भया बचाओ समितीच्या कल्याण शाखेकडून स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली होती.
00000
