मीरा-भाईंदर / प्रतिनिधी.
बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडू नये, यासाठी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक’ हा धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेच्या 230 शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. मीरा-भाईंदर महापालिकेत एकूण ३६ शाळा आहेत. या शाळांमध्ये 9 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच सुरक्षिततेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना, समस्या सातत्याने समोर येत आहेत, त्यामुळे मुलांना याबाबत सावध करणे गरजेचे आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना ‘बाल लैंगिक अत्याचार’ प्रतिबंधात्मक धडे देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आणि प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन एज्युकेशन’ समितीला आदेश दिले होते, त्याअंतर्गत सर्वप्रथम त्यांनी शिक्षकांना याबाबत जागरूक करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. त्यासाठी ‘अर्पण’ या सामाजिक संस्थेची मदत घेतली जात आहे. ही संस्था गेली अनेक वर्षे जागतिक स्तरावर बाल लैंगिक शोषण निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. या संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत नुकतेच महापालिकेच्या 230 शिक्षकांना बाल लैंगिक शोषण ओळखण्यासाठी प्रशिक्षित आणि POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) नियमांचे संपूर्ण ज्ञान, 6 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वैयक्तिक सुरक्षितता, शिक्षण आणि जीवन कौशल्ये यावर तपशीलवार सखोल मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्यात आले.
कोट
मुलांसोबत अनैतिक घटना घडल्यास त्यांच्या वर्तनात बदल होऊ लागतो, त्यामुळे शिक्षकांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवावे लागते. बदलांचा मागोवा ठेवण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले गेले आहे. विद्यार्थ्यांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी आणि लैंगिक छळाच्या घटनांना तोंड देण्यासाठी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रसाद शिंगटे, उपायुक्त एमबीएमसी
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *