अंबरनाथच्या महामार्गावरील खांब; महावितरणकडून सातत्याने पाठपुरावा
कल्याण: अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर महामार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आहे. महामार्गाचे रुंदीकरण करतांना विजेचे खांब स्थलांतरित करण्यासाठी एमएमआरडीएने दिलेला प्रस्ताव १.३ टक्के डीडीएफ योजनेतून मंजूर करून महावितरणने मार्च २०२० मध्येच एमएमआरडीएला दिला. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील काम मात्र संथ गतीने सुरू आहे. दरम्यान अपघात टाळण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या खांबांना रेडियमच्या पट्ट्या लावण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापुर महामार्गाचे रुंदीकरण करताना विजेचे खांब स्थलांतरित करण्याबाबत एमएमआरडीएने प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला महावितरणने मार्च आणि ऑगस्ट २०२० मध्ये १.३ टक्के डीडीएफ योजनेतून मंजुरी दिली. त्यानुसार रुंदिकरण करताना विजेचे खांब स्थलांतरीत करण्याचे काम एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता (विदयुत) यांच्यावर आहे. महावितरणची जबाबदारी केवळ संबंधित कामावर देखरेख ठेवण्यापर्यंत मर्यादित आहे. पहिल्या टप्प्यातील वाहिन्या भूमिगत करण्याचे काम जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण झाले. उर्वरित कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी महावितरणने एमएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार एमएमआरडीएने देखरेख शुल्काचा भरणा करून मे. टॉप ईलेक्ट्रीकल या कंत्राटदाराकडे काम सोपवले आहे. एमएमआरडीए, महावितरण आणि कंत्राटदाराकडून संयुक्त पाहणी करून कामास सुरूवात करण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी तुर्तास अडथळा ठरणाऱ्या खांबांना रेडियमच्या पट्ट्या लावण्यात असल्या आहेत. खांब स्थलांतरित करण्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महावितरण एमएमआरडीएच्या कंत्राटदारास संपूर्ण सहकार्य करत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.