पूर्वी क्वचितच नजरेस पडणारे बिबटे आता सर्रास नागरी वस्तीत दिसू लागले आहेत. दररोज कुठे ना कुठे बिबट्याने घुसखोरी केल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचायला मिळतेच. पूर्वी फक्त ग्रामीण भागात दिसणारे बिबटे आता पुण्या – मुंबई सारख्या मेट्रो शहरातही दिसत आहेत. पुण्या – मुंबई सारख्या मोठ्या शहरातील सोसायटी आणि कॉलनीतही बिबटे येत आहेत. बिबट्यांच्या या वाढत्या घुसखोरीमुळे नागरी वस्तीत भीतीचे सावट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात तर सर्रास बिबटे नजरेस पडत आहेत. सध्या ग्रामीण भागात ऊस तोडणी सुरू आहे. उसाच्या शेतात बिबट्यांची पिल्ले सापडत आहेत. ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर नित्याचा बनला आहे. नागरी वस्तीत आणि शेतांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात येतात. बिबटे नागरी वस्तीत घुसून पाळीव प्राण्यांचा फडशा पाडत आहे. काही वेळा तर बिबट्यांकडून नागरिकांवर जीवघेणे हल्ले देखील होत आहेत. दौंड, शिरूर या तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एक महिला व दोन मुलांना जीव गमवावा लागला आहे. दौंड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर या पुणे जिल्ह्यातील तालुक्यात बिबट्यांनी उच्छाद मांडला असून या भागात बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली असून नागरिक भयभीत झाले आहे त्यामुळेच या नरभक्षक बिबट्यांना वन विभागाने ठार करावे अशी मागणी नागरिक करत आहेत अर्थात नरभक्षक बिबट्यांना ठार करणेच योग्य. याआधीही वन विभागाकडून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यात आले आहे. काही वर्षापूर्वी जळगाव जिल्ह्यात एका नरभक्षक बिबट्याने उच्छाद मांडला होता. या नरभक्षक बिबट्याला वन विभागाकडून ठार मारण्यात आले होते. राज्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही बिबट्यांचा वावर वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे पण बिबट्यांना नागरी वस्तीत घुसखोरी का करावी लागते याचाही विचार आपण करायला हवा. बिबट्यांचा जो नैसर्गिक अधिवास समजला जातो ते जंगल आज राहिले नाही. माणसांनी स्वतःच्या फायद्यासाठी जंगलतोड केली. बिबट्यांना लपण्यासाठी जी झाडे झुडपे होती त्याची कत्तल माणसांनी केली त्यामुळे बिबट्यांना नैसर्गिक अधिवास राहिला नाही. माणसांनी बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासात अतिक्रमण केले. माणसांनी बिबट्यांचा निवारा हिसकावून घेतला. माणसानेच आधी बिबट्याच्या निवाऱ्यात घुसखोरी केली त्यामुळे बिबट्याही आता नागरी वस्तीत घुसखोरी करीत आहेत. बिबट्यांनी जर नागरी वस्तीत घुसखोरी करू नये असे आपल्याला वाटत असेल तर बिबट्यांना पुन्हा त्याचा नैसर्गिक अधिवास मिळवून द्यायला हवा. यासाठी वन विभागाने ठोस उपक्रम राबवायला हवेत. जंगलतोड थांबवायला हवी. वृक्षतोड थांबवायला हवी. वन विभागाने वृक्षारोपण मोहीम राबवून ते वृक्ष जगवले पाहिजे. जंगलामध्ये रानावनामध्ये झुडपांची लागवड केली पाहिजे जर बिबट्यांना लपण्यासाठी झाडे झुडपे मिळाली तर ते शेतामध्ये येणार नाहीत. बिबट्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळाला तर बिबटे नागरी वस्तीत घुसखोरी करणार नाहीत.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५