तेलंगणामध्ये ‌‘मनी लाँड्रिग‌’च्या कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव के. टी. रामाराव यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी कविता दिल्ली दारू घोटाळ्यात अडकली होती. ती तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर आता मुलगा के.टी. रामाराव मोठ्या राजकीय आणि वैयक्तिक संकटाचा सामना करत आहे. तेलगणामध्ये सूडनाट्य पेटले आहे.

कोणताही पक्ष कायम पराभूत होत नसतो, तसेच कायम विजयी होत नसतो. जनता राजकीय पक्षांना जोखत असते. सहनशीलतेच्या पलीकडे गेले की जनता कितीही मोठा पक्ष असला, तरी धडा शिकवते. नुकत्याच निवडून दिलेल्या सरकारविरोधातही ती बंड करू शकते. याच सुमारास राजकीय विरोधकाला कस्पटासमान वागवायची सध्याच्या सत्ताधाऱ्यांची रीत झाली आहे. आपल्या हाती असलेल्या वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून एखाद्याला आयुष्यातून उठवले जाते. गंभीर गुन्हा असला, तर तसे करायलाही हरकत नाही; परंतु हेमंत सोरेन यांनी पाच महिने तुरुंगात काढल्यानंतर त्यांच्याबाबत न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे तपासी यंत्रणाच्या तपास पद्धतीवरच प्रश्न उपस्थित करणारी आहेत. महाराष्ट्रातही अजित पवार, रवींद्र वायकर यांच्याविरोधात तपास यंत्रणेने चुकीच्या माहितीवर कारवाई केली, असा पवित्रा घेतला. या यंत्रणांमुळे झालेल्या बदनामीमुळे कोणी न्यायालयात खेचत नाही, हे त्यांचे भाग्य. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांनाही असेच तुरुंगात पाठवण्यात आले. ते संपले, असे वाटत असताना दहा वर्षांनंतर का होईना, त्यांचे जोरात राजकीय पुनरागमन झाले. जगातील वेगवेगळ्या देशातील उद्रेक पाहिले, तर तिथेही सत्ताधाऱ्यांनी अतिरेक केल्यामुळे विद्रोहाची लाट आली. जनतेच्या उठावापुढे सत्ताधीशांना नमावे लागले. लोकशाही व्यवस्थेतही सर्वच यंत्रणांना सर्व काळ मॅनेज करता येते, असा काहींचा गैरसमज असेल, तर तो ही जनता कधी ना कधी दूर करतेच.
‌‘मनी लाँड्रिग‌’च्या कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव के. टी. रामाराव यांच्याविरोधात आता कारवाई सुरू झाली आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी कविता दिल्ली दारू घोटाळ्यात अडकली होती. कविता तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर आता मुलगा के.टी. रामाराव मोठ्या राजकीय आणि वैयक्तिक संकटाचा सामना करत आहे. तेलंगणातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केटीआर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2023 मध्ये हैदराबादमध्ये झालेल्या फॉर्म्युला-ई शर्यतीच्या दुसऱ्या स्पर्धेच्या वेळी केटीआर यांनी लंडनच्या एका कंपनीला 55 कोटी रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबरोबरच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केटीआरविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत माहिती अहवालदेखील दाखल केला आहे. ‌‘हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी‌’ (एचएमडीए)कडून ‌‘फॉर्म्युला-ई ऑपरेशन्स‌’मध्ये 55 कोटी रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. त्यासाठी कोणतीही औपचारिक मान्यता घेण्यात आली नव्हती. या आरोपांवर केटीआर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यात घोटाळ्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पैसे हस्तांतरित झाल्याचे आणि त्याचा वापर केल्याचे प्राप्तकर्त्याने मान्य केले आहे. त्यामुळे हा गैरव्यवहार होत नाही, तर ती अनियमितता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. भारत राष्ट्र समिती या पक्षाचे म्हणणे आहे, की मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या प्रकरणांचा वापर करून त्यांची राजकीय बदनामी करत आहेत.
या प्रकरणी केटीआर यांनी हेही कबूल केले की, मंत्री या नात्याने त्यांनी विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार (या प्रकरणातील दुसरा आरोपी) यांना पैसे देण्यास सांगितले होते. रेड्डी आणि ‌‘बीआरएस‌’मधील वैर कोणापासून लपलेले नाही. काँग्रेसची सत्ता आल्यास या कुटुंबाला तुरुंगात पाठवू, असे रेवंत यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होते. 2015 मध्ये ‌‘कॅश फॉर व्होट‌’ प्रकरणात तुरुंगात घालवलेल्या एका महिन्याबद्दल रेवंत रेड्डी संतापलेले आहेत. ते तेव्हा ‌‘टीडीपी‌’चे आमदार होते आणि एका अपक्ष आमदाराला पैसे देताना व्हिडीओमध्ये पकडले गेले. हा गुन्हाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोंदवला होता आणि आता हाच विभाग केटीआर यांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. रेड्डी काँग्रेसमध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी ‌‘बीआरएस‌’ला कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाहीत. केटीआर यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाला चौकशीचे आदेश देऊन त्यांनी मोठा राजकीय जुगार खेळला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने केटीआर यांच्या अटकेला 30 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे; परंतु त्यांना अटक झाल्यास पक्षाला बळ मिळू शकते किंवा कमी होऊ शकते. त्यामुळे ‌‘बीआरएस‌’चे काही आमदारही पक्ष सोडू शकतात. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय झाल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रकरण पुढे चालवण्याची परवानगी दिली.
भाजप आणि काँग्रेस विळ्या-भोपळ्याचे सख्य असताना या प्रकरणात मात्र रेवंत रेड्डी यांनी या प्रकरणी कारवाईसाठी दिल्लीतून भाजपचा पाठिंबा घेतला आहे, असा आरोप ‌‘बीआरएस‌’ करत आहे. आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेतून रेवंत रेड्डी यांनी धडा घ्यायला पाहिजे. नायडू यांच्या अटकेमुळे त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली. त्यामुळे ते 2024 मध्ये सत्तेत परतले. विशेषतः तरुण आणि शहरी भागात केटीआर यांची लोकप्रियता आहे. अशा परिस्थितीत रेवंत यांनी अत्यंत सावधपणे पावले उचलण्याची गरज आहे. तेलंगणामधले राजकारण सध्या गोंधळाचे आहे. आता केटीआर आणि बीआरएस या संकटाचा सामना कसा करतात आणि काँग्रेस हा राजकीय जुगार कसा खेळते हे पाहायचे आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालया (ईडी) नेही केटी रामाराव, वरिष्ठ आयएएस अरविंद कुमार आणि ‌‘एचएमडीए‌’चे माजी मुख्य अभियंता बीएलएन रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‌‘मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा‌’ (पीएमएलए) आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत ‌‘ईडी‌’ने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये ही घटना घडली आहे. ‌‘ईडी‌’च्या सूत्रांनी या प्रकरणाच्या नोंदणीची पुष्टी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा एकाच वेळी कशा सक्रिय झाल्या, याचे कोडे सामान्यांना पडले असले, तरी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने ही दोन्ही सरकारे एकत्र येऊन यंत्रणांना कामाला लावले असल्याचा संशय आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक ब्यूरोने (एसीबी) केटीआर यांच्याविरुद्ध मागील सरकारच्या काळात हैदराबादमध्ये फॉर्म्युला-ई रेस आयोजित करण्यात अनियमितता केल्याबद्दल फिर्याद दाखल केली होता. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी अलीकडेच या मुद्द्यावर केटी रामाराव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास परवानगी दिली होती. रामाराव आणि अन्य दोन अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ‌‘ईडी‌’चा तपास ‌‘एसीबी‌’च्या तपासाच्या समांतर चालेल, असे मानले जात आहे. ‌‘आवश्यकता भासल्यास ईडी‌’ रामाराव आणि इतर दोन आरोपींच्या निवासस्थानांची झडती घेऊन छापे टाकू शकते. तीन आरोपींना येत्या काही दिवसांमध्ये हजर राहण्यासाठी ‌‘ईडी‌’ नोटीस बजावू शकते. या शक्यतेमुळे रामाराव आणि त्यांच्या समर्थकांची चिंता वाढली आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेत एचएमडीए‌’ (हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी) चे खाते आहे आणि त्या खात्यातून रेस आयोजनाप्रसंगी पैसे ट्रान्सफर करण्यात आले. भारत राष्ट्र समितीचे आमदार केटीआर यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांच्या आरोपांनुसार तेलंगणाच्या जीएसटी संकलनात वर्षभरात एक टक्क्यांहून कमी घट झाली आहे. त्यांच्या मते तेलंगणामध्ये नेहमीच जीएसटी संकलनात किमान 15 टक्के वाढ झाली आहे. तेलंगणा आता उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करत आहे. राज्याने आपल्या विनाशकारी धोरणांमुळे जीएसटी संकलनात शेवटच्या स्थानावर असण्याचा पराक्रम साधला आहे. एकंदरीत, सत्तास्थानी आल्यावर रेवंत रेड्डी सरकार दांडगाई करत विरोधकांवर कारवाई करत आहे. मात्र या कामी अंतिमत: कोणाची बाजू उचलून धरली जाते, हे आता पहायचे.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *