कोरोनानंतर अलिकडेच चीनमधून आणखी एक विषाणू भारतात आला. त्याचे नाव ‌‘ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस‌’. त्याला लोक ‌‘एचएमपीव्ही‌’म्हणून ओळखतात. भारतात गेल्या आठवड्यापासून त्याची चर्चा सुरू होती. त्याचा पसरण्याचा वेग, मुले आणि वृद्धांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आदींबाबत माध्यमांतून रकानेच्या रकाने भरून येऊ लागले; परंतु या विषाणूबाबत वेगवेगळे दावे, प्रतिदावे केले जात असल्याने सामान्यांच्या मनात साशंकता होती. भारतात या व्याधीची एकाच दिवशी पाचहून अधिक प्रकरणे आढळल्याने चिंतेचे वातावरण होते. केंद्र आणि राज्य सरकारे यामुळे ‌‘अलर्ट मोड‌’वर आली. कोरोनाचा अनुभव पाठिशी असल्याने सरकार कोणतेही निर्णय घाईघाईत घेणार नाही. मार्गदर्शक सूचनांचा लगेच भडीमारही करणार नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करतानाही फार घाबरून काही करायची सरकार आणि लोकांचीही मानसिकता नाही. असे असले, तरी संवेदनशील असलेल्या भांडवली बाजाराने भारतात या विषाणूचे रुग्ण आढळल्याने लोटांगणच घातले. त्यामुळे गुंतवणूकदार 11 लाख कोटी रुपयांना झोपले; अर्थात त्यामागे हेच एकमेव कारण नव्हते, हे ही खरेच. एकूण गुंतवणूकदारांनी आता गुंतवणूक करताना जशी काळजी घ्यायची आवश्यकता आहे, तशीच सार्वजनिक जीवनात वावरताना आपणा सर्वांनाही सार्वजनिक भान ठेवण्याचीही गरज आहे. कुणी काही बंधने आणण्याची वाट न पाहता खबरदारी घेऊन वागल्यास अशा संसर्गजन्य आजारांवर आपल्याला मात करता येईल.
कोरोनाच्या साथीच्या काळात जग घाबरून घरात बसले असताना तैवान आणि न्यूझिलंडच्या दोन राष्ट्रप्रमुख महिलांनी केलेल्या उपाययोजना लक्षात घेतल्या असता यासंदर्भात दिशा मिळू शकते. मुले आणि वृद्धांना जपण्याचा त्यांचा मूलमंत्र आताही तितकाच उपयुक्त आहे. या दोन घटकांची प्रतिकारशक्ती अन्य वयोगटातील लोकांपेक्षा कमी असल्याने काळजी घेतली पाहिजे. एक वयोगट आपला संचित आहे, तर दुसरा भविष्य आहे, याचे भान ठेवले पाहिजे. एचएमपीव्ही नवीन नाही; परंतु कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हा विषाणू हिवाळ्यात आणि थंड हवामानात वाढतो. भारतात त्याची काही प्रकरणे समोर आली. ‌‘आयसीएमआर‌’कडून मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई, गुजरात, कर्नाटक या तीन राज्यांमध्ये असे रुग्ण आढळले. त्यातही लहान बाळांचे प्रमाण अधिक आहे. परदेशात न जाताही त्यांना ‌‘एचएमपीव्ही‌’ची लागण कशी झाली, हा आता स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एक इशारा देताना म्हटले आहे की, भारत श्वसन रोगांच्या संभाव्य वाढीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. भारतासह जगभरात ‌‘एचएमपीव्ही‌’ आधीच प्रचलित आहे. ‌‘एचएमपीव्ही‌’संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे अनेक देशांमध्ये नोंदवली गेली आहेत. ‌‘आयसीएमआर‌’ वर्षभर ‌‘एचएमपीव्ही‌’ अभिसरणातील ट्रेंडचे निरीक्षण करणे सुरू ठेवेल.
अहमदाबाद आणि बंगळुरूच्या दोन्ही मुलांना ‌‘ब्रॉन्कोप्न्यूमोनिया‌’ नावाचा न्यूमोनियाचा इतिहास होता. तो फुफ्फुसाचा एक प्रकारचा संसर्ग आहे. ‌‘ब्रोन्कोप्न्यूमोनिया‌’ फुफ्फुस आणि श्वासनलिकांमधील अल्व्होलीवर परिणाम करते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. ‌‘एचएमपीव्ही‌’ प्रथम 2001 मध्ये आढळला आणि श्वसन सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही) सह न्यूमोव्हिरिडे कुटुंबाचा एक भाग मानला गेला. ‌‘एचएमपीव्ही‌’शी संबंधित लक्षणांमध्ये सामान्यतः खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यात अडचण यांचा समावेश होतो. या आजारामुळे वृद्ध आणि अगदी लहान मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात. खोकला आणि सर्दी असेल तर संबंधिताने अनेक लोकांच्या संपर्कात येणे टाळावे. त्यामुळे संसर्ग पसरणार नाही. खोकताना आणि शिंकण्यासाठी वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरावा. ‌‘एचएमपीव्ही‌’ सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करू शकत असला, तरी सामान्यतः लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांमध्ये त्याचा संसर्ग वेगाने होतो. ‌‘एचएमपीव्ही‌’मुळे इतर श्वसन विषाणूंप्रमाणेच अनेक गुंतागुंती होऊ शकतात. विशेषतः वरच्या आणि खालच्या श्वसनमार्गामध्ये संसर्ग होऊ शकतो. ‌‘एचएमपीव्ही‌’ संसर्ग सौम्य सर्दीसारख्या लक्षणांपासून गंभीर न्यूमोनिया किंवा ‌‘ब्रॉन्कायलाइटिस‌’पर्यंत असू शकतो.
‌‘एचएमपीव्ही‌’ च्या संसर्गाची लक्षणे इतर श्वसनाच्या आजारांसारखी असू शकतात. दरम्यान, ‌‘एचएमपीव्ही‌’मुळे कोरोनाच्या काळासारखी परिस्थिती चीनमध्ये पुन्हा निर्माण होऊ लागली. रुग्णालये आणि स्मशानभूमीत गर्दी वाढत असल्याच्या बातम्या आणि ‌‘सोशल मीडिया‌’वर व्हायरल करणाऱ्या व्हिडीओमुळे जगभराची झोप उडाली. त्याची वस्तुस्थिती किती आणि फेक न्यूज किती याचा कोणीच विचार केला नाही. त्यामुळे जगावर भीतीचे सावट आले. मानवी मेटापन्यूमोव्हायरस हा नवीन विषाणू नसला, तरी त्याचे स्वरूप आणि संसर्गजन्यता दिसून येत असल्याने हा संसर्ग नियंत्रित केला न गेल्यास पाच वर्षांमध्ये आणखी एक जागतिक महामारी होऊ शकते, असा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. 20-25 दिवसांमध्ये ‌‘एचएमपीव्ही‌’ने चीनसह जगभरातील आरोग्य संस्थांना निद्रानाशाचा विकार दिला. ‌‘एचएमपीव्ही‌’च्या जागतिक धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी सर्व लोकांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजणे सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे हा फारसा गंभीर विषाणू नाही. त्याने संक्रमित झालेल्यांपैकी बहुतेक लोकांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात. यामुळे दमा किंवा ब्राँकायटिसची समस्या उद्भवू शकते.
चीनमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरसचे प्रमाण वाढण्याचे आणि मोठ्या प्रमाणात लोकांवर परिणाम होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोविडच्या काळात तेथे लागू करण्यात आलेली झिरो-कोविड पॉलिसी. मार्च 2020 मध्ये टाळेबंदी करण्यात आली, ती डिसेंबर 2023 पर्यंत अत्यंत कठोरपणे सुरू होती. या काळात जन्मलेली मुले ना शाळेत गेली, ना त्यांचा इतर लोकांशी फारसा संवाद किंवा संपर्क झाला. यामुळेच अशा मुलांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे तेथील मुलांना या नवीन उत्परिवर्तित विषाणूंचा सध्या जास्त फटका बसताना दिसत आहे. भारतासारख्या देशात मुलांची प्रतिकारशक्ती वेळेत चांगली विकसित होते, त्यामुळे ‌‘एचएमपीव्ही‌’पसरण्याची शक्यता नाही. भारतात त्याला रोखण्यासाठी विशेष उपायांची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *