१२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार

 

बदलापूर: बदलापूर शहरातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी अंबरनाथच्या प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणारी जुनी जलवाहिनी सातत्याने फुटत असल्याने त्यातून निघणारे सांडपाणी नैसर्गिक नाल्यामार्गे थेट उल्हास नदीत जाऊन मिळत होते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत होता. आता हे सांडपाणी नेण्यासाठी भुयारी गटार योजना राबवली जाते आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते १२८ कोटींच्या या योजनेचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यामुळे बदलापूर पूर्वेतील कर्जत राज्य मार्गावर होणारा त्रास कमी होणार आहे.
बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी कल्याणच्या खाडीपर्यंत वाहून नेण्यासाठी एमआयडीसीत जुनी वाहिनी होती. मात्र ती जीर्ण झाल्याने वारंवार वाहिनी फुटून शहरी भागात रासायनिक सांडपाणी रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत होत्या. ही वाहिनी बदलापूर पूर्वेतील वर्दळीच्या कर्जत राज्यमार्गावरून जात होती. अनेक मोठे वाणिज्य आस्थापना, कार्यालये आणि हॉटेल या मार्गावर होते. जलवाहिनी फुटल्याने अनेकदा हेच सांडपाणी शेजारच्या रहिवासी इमारतींमध्ये जात होते. तर शेजारी असलेल्या नाल्यामार्गे हेच सांडपाणी उल्हास नदीतही जात होते. उल्हास नदीवरील आपटी बंधारा येथून उचललेले पाणी जिल्ह्यातील बहुतांश शहरांना दिले जाते. त्यामुळे सांडपाणी मिसळल्याने पिण्याच्या पाण्याला दर्प येण्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या सगळ्यावर उपाय म्हणून रासायनिक सांडपाण्याची ही वाहिनी भूमिगत करण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला. त्याला उद्योग विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार आता १२८ कोटी रुपयांच्या खर्चातून बदलापूर औद्योगिक वसाहत ते अंबरनाथ सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशी ही रासायनिक सांडपाण्याची भुयारी गटार योजना राबवली जाणार जाते आहे.
नुकतेच आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होऊन रासायनिक सांडपाण्याचा त्रास पूर्णपणे बंद होईल, असे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *