संबंधितांवर कारवाई करण्याची परहित चॅरिटेबल सोसायटीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कल्याण : कल्याण तालुक्यातील कांबा येथील एकूण ४६० एकर क्षेत्र असलेल्या आणि अंदाजे रूपये दोन हजार करोड किंमतीच्या एका जमिनीवरील कब्जेदार आणि वहिवाटदार आदिवासी समाजाच्या सदस्यांना स्थानिक भूमाफिया पैशाच्या, बळाच्या, दहशतीच्या जोरावर विस्थापित करून सामाजिक अन्याय आणि शोषण करीत असून या आदिवासी समाजाच्या सदस्यांना विस्थापित करण्याचा भूमाफियांनी घाट घातला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विनंतीनुसार सबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
स्वतः शेतकरी नसणाऱ्या शहा कुटुंबीयांनी बेकायदेशीररित्या कांबा येथे जमिनी विकत घेतल्या. या जमिनीच्या काही भूभागावर पूर्वापार पासून आदिवासी समाजाच्या सदस्यांचा कब्जा, वहिवाट आणि कुळ आहे. आदिवासी समाजाचे सदस्य मुळातच दुर्बल, अशिक्षीत, गरीब आणि त्यांच्या अधिकारांची जाणीव नसणारे असल्यामुळे ते न्यायालयीन संघर्ष करण्यास कमी पडत आहेत. याचा फायदा घेऊन पैशाच्या जोरावर न्याय खेचून आणत असून आदिवासी कटुंबाचे न्याय हक्क मारून त्यांच्यावर अन्याय करत आहेत.
आदिवासी सदस्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी या भूमाफियांनी स्थानिक गुंड टोळीची मदत घेतली असून, त्या गुडांच्या भितीने आदिवासी सदस्य प्रचंड दहशतीखाली असून जिव मुठीत घेवून जिवन जगत आहेत. त्यासाठी आदिवासी कब्जेदार वहिवाटदार यांना पोलीस संरक्षण प्रदान करावे आणि शहा कुटुंबिय आणि त्यांचे स्थानिक गुड यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई आणि उचित पोलीस कारवाई करावी.
विषयांकीत वाद जमिनीबाबत दावे उच्च न्यायालयात आणि उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्या न्यायालयात प्रलंबीत असल्यामुळे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम कलम ५२ अन्वये शहा कुटुंबियांना मालमत्ता हस्तांतरणास अथवा जमिन खरेदी विक्रीस परवानगी देऊ नये. जमिनीवरील गैर व्यवहाराबाबत चर्चा करण्यासाठी आणि वस्तुस्थिती आणि कागदपत्रे आपणाकडे सादर करण्यासाठी आदिवासी सदस्यांना भेटीची वेळ मिळावी.
आदिवासींवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांची बाजू आपणाकडून न ऐकली गेल्यास, आदिवासी समाजास आमरण उपोषण, आंदोलन करण्याशिवाय आणि न्यायासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे दाद मागण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या प्रकरणात तात्काळ न्यायोचित कारवाई करण्याची मागणी परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
0000